अंबाजोगाई । दि. २२ ।
सर्वसामान्य लोकांचे जीवन कष्टमुक्त व्हावे, त्यांचे जीवनमान उंचावे व त्यांना योग्य सन्मान मिळावा याकरिता केंद्र सरकार विविध लोकोपयोगी योजना राबवित आहे. गरजू लोकांपर्यंत या सर्व योजना पोहोचत असल्याने प्रत्येक योजनेला विस्तारित स्वरूप देण्यात आले आहे आणि त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला योजनांचे लाभ मिळत आहेत. सर्वसामान्य लोकांचे जीवन यामाध्यमतून कष्टमुक्त होत असल्याचे खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने महा-जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत आयोजित लाभार्थी मेळाव्याला खा.प्रितमताई मुंडे यांनी मार्गदर्शन केले. परळी विधानसभा मतदार संघातील पूस इथे हा मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष अच्युत बापू गंगने, जेष्ठ नेते जीवनराव किर्दंत, गणेश कराड,बिभीषण गित्ते, संजय गिराम, दत्ता जाधव, बंडू चाटे , ज्ञानेश्वरी पवार, आदिनाथ गौरशेटे, आयुब पठाण, महेश्वर अप्पा बरदापुरे, शशी गौरशेटे, लक्ष्मीकांत पवार, विजयकांत पवार यांच्यासह भाजप पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या नऊ वर्षातील कार्याचा आढावा देताना खा. प्रितमताई मुंडे म्हणाल्या कि ‘सर्व घटकांना सोयी सुविधा मिळवून देताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा ही यथोचित सन्मान केला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेन्शन देणारी ऐतिहासिक योजना आपल सरकार राबवित आहे. आपल्या देशातील समाज व्यवस्था चांगली आहे. सर्वांना सोबत घेऊन केंद्र सरकारने आपल्या आस्थेचे प्रतीक असलेल्या अनेक श्रद्धास्थानांचा जीर्णोद्धार केला आहे. सेवा ,सुशासन आणि विकासाचे हे पर्व कायम ठेवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचे आवाहन ही यावेळी त्यांनी केले. तत्पूर्वी उज्वला गॅस योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते गॅसचे वाटप करण्यात आले.
टिफिन बैठकीमुळे वाढला कार्यकर्त्यांचा उत्साह
अंबाजोगाई तालुक्यातील आणि परळी मतदारसंघातील धानोरा इथे भाजप कार्यकर्त्यांची टिफिन बैठक संपन्न झाली. खा.प्रितमताई मुंडे यांच्या मुक्त संवादाने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. पक्ष,संघटना आणि कौटुंबिक संवादाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.आपापल्या भागातील विविध समस्या टिफिन बैठकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी मांडल्या, खा.प्रितमताई मुंडे यांनी देखील तितक्याच संवेदनशीलपणे कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पाऊले उचलली.
••••















