बीड- लाख रुपये गुंतवणूक करा अन बारा महिने दहा हजार रुपये कमवा, वर्षभरानंतर मुद्दल परत मिळवा अशी स्कीम सध्या परळी, अंबाजोगाई, केज, लातूर सह मराठवाड्यातील चार पाच जिल्ह्यात जोरात सुरू आहे.हा सगळा प्रकार बोगस असल्याचे लक्षात आल्यानंतर देखील लोक या भामट्या च्या आमिषाला बळी पडत आहेत हे विशेष. या प्रकरणात सिरसाळा पोलिसात प्रकरण देखील गेले होते मात्र नंतर काय सेटलमेंट झाली माहीत नाही.
बीड जिल्ह्यातील मूळचा परळी येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने अंबाजोगाई मध्ये जनसुराज्य नावाने एक कार्यालय थाटले. मोठा गाजावाजा करत याने आपल्या जवळच्या, परिचित, मित्रमंडळी, नातेवाईक यांना आपल्याकडे गुंतवणूक स्कीम असल्याचे सांगत पैसे गोळा केले.
नांदेड पासून ते लातूर पर्यंत या व्यक्तीने मोठे नेटवर्क उभे केले. या नेत्याच्या जवळचा,त्या नेत्याच्या कुटुंबातला अस सांगून त्याने परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव, रेणापूर, सोनपेठ, परभणी, कळंब यासह जवळपास शंभर ते दीडशे कोटी रुपये जमा केले. लाखाला दहा हजार रुपये महिना या पद्धतीने त्याने कोट्यवधी रुपये जमा केले.मात्र काही महिने परतावा दिल्यानंतर पैसे वेळेत मिळेनासे झाले.त्यानंतर हा सगळा प्रकार बोगस असल्याचे समोर आले.विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या, भाजपच्या काही प्रमुख नेत्यांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी यात गुंतवणूक केली आहे. परळी अंबाजोगाई मधील काही ग्रामीण पत्रकार देखील यात अडकले आहेत. यातील काही जणांनी सिरसाळा पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. प्रकरण ठाण्यात गेले देखील मात्र त्यानंतर नेमकी काय सेटलमेंट झाली माहीत नाही पण अद्याप गुन्हा दाखल झाला नाही किंवा कारवाई देखील झालेली नाही.