बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) : ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसी हा संबंध देशभरात गाजलेला टिव्ही शो. मात्र याच शोच्या नावाचा गैरवापर करत सायबर भामटे नेहमी सावज’ शोधत असतात. असाच एक ऑनलाईन फ्रॉडचा प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. केबीसी’ नावाच्या व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करुन शहरातील एका शिक्षकाला सायबर भामट्यांनी केबीसी लॉटरी व कारचे आमिष दाखवून तब्बल 29 लाख 23 हजार रुपयांना गंडा घातला. कार अन् लॉटरीच्या मोहात अडकलेल्या शिक्षकाला हे भामटे 30 वेळेस कॉल करुन विविध प्रक्रिया शुल्क, टॅक्स, जीएसटी, सेवाशुल्क, वाहतूक खर्च आदीच्या नावाखाली पैसे भरावे लागतील असे सांगून वेगवेगळे बँक खाते नंबर देवून लुटत राहिले. अखेर आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर या सार्या ऑनलाईन फ्रॉडचा भांडाफोड झाला. शिक्षकाच्या फिर्यादीवरुन 2 मार्च रोजी रात्री शहर पोलीस ठाण्यात दोन आरोपीविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.
मोहम्मद फहीमोद्दीन अब्दुल रहीम (52) असे फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. शहरातील झमझम कॉलनीत ते राहतात. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद शिक्षिका असून ते बीडमध्ये उर्दू प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. 11 डिसेंबर 2021 रोजी ते घरी असताना अनोळखी भामट्याने त्यांना एका व्हॉटस्अप ग्रुपवर अनोळखी व्यक्तीने समाविष्ट केले. केबीसी नावाच्या या ग्रुपवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात 25 लाखांची लॉटरी व आलिशान कार बक्षीस म्हणून दिल्याचे दाखविले होते. हे पाहून 13 डिसेंबर रोजी शिक्षक मोहम्मद रहीम यांनी संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क केला. त्याने मोहम्मद यांना बोलण्यात गुंतवून ठेवत 30 टप्प्यांत वेगवेगळ्या थापा मारल्या. ऑनलाईन फ्रॉड करणार्या मनीष कुमार अन् आकाश वर्मा असे स्वत:चे नाव सांगणार्या भामट्यांनी बीडमधील शिक्षक मोहम्मद रहीम यांना सातत्याने कारचा मोह दाखवला, तुमच्यासाठी दुबईहून कार येत असून त्या कारचे काही फोटोही त्यांनी मोहम्मद रहीम यांना पाठवले अन् त्यांचा विश्वास संपादन केला. म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेऊन वेगवेगळ्या खात्यात ते पैसे भरत राहिले. याचाच फायदा घेत भामट्यांनी त्यांच्याकडून प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली तब्बल 29 लाख 23 हजार रुपये उकळले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये मनीष कुमार, आकाश वर्मा यांच्यावर गुन्हा नोंद झाला. तपास पो.नि.रवी सानप करत आहेत. अमिषाला भुलून नागरिकांनी अशा अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करुनस्वत:ची आर्थिक फसवणूक करुन घेऊ नये असे आवाहन बीड शहर ठाणे निरीक्षक रवी सानप यांनी केले आहे.