‘थांबला असला श्वास तरी सूर राहील सदा सोबतीला…’ जो सूर ऐकत देशाच्या अनेक पिढ्यांना गाणं म्हणजे काय हे कळलं. संगीत विश्वातील मातब्बर मंडळी ज्या सुरांना ‘ईश्वाराचं देणं’ मानत वंदन करतात अशा भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. तसंच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. कोरोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
देशासह जगभरातील श्रोत्यांच्या जगण्याला अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर हरपल्यानं आज संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. जवळजवळ सहा दशकांच्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान कारकीर्दीत दीदींनी जितक्या संगीतप्रेमींना- मग तो सर्वसामान्य श्रोता असो किंवा दर्दी- ज्या प्रमाणात आनंद दिला आहे, तितका आनंद देशाच्या पॉप्युलर कल्चरच्या इतिहासात कुठल्याही इतर कलाकाराने दिलेला नाही. आकाशात देव आहे का असं कुणी विचारलं तर देवाचं माहित नाही. पण आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे!. दिवस-रात्र अशी कुठलीही वेळ नाही किंवा क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो, अशा शब्दांत पु.ल.देशपांडे यांनी लतादीदींच्या महतीचं वर्णन केलं होतं. हृदय आणि मन यांपासून देवाने आवाज सारख्याच अंतरावर ठेवला आहे असं म्हणतात. कोणतीही महान गायकी ही भावना आणि तंत्र या घटकांचा समन्वय असते. लता दीदींच्या आवाजात या दोन्ही घटकांचा अप्रतिम संगम झाला होता. लता दीदींची प्रतिभा बऱ्याच प्रमाणात निसर्गदत्त असली तरी त्यात उत्कट संगीतसाधना आणि कुशाग्र बुद्धिमत्ता यांचा खूप मोठा सहभाग होता. जोवर भारतीयांच्या मनात धर्मप्रेम व देशप्रेम जागं आहे तोवर प्रत्येक गणेशोत्सवात, शिवजयंतीला, स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी लतादीदींची गाणी ऐकू येत राहतील. कबीर, मीरा व सूरदासांच्या भजनांतून, ग़ालिबच्या गजलांतून, ‘शिवकल्याण राजा’तल्या गाण्यांतून, ज्ञानदेवांच्या पसायदानातून आणि तुकोबांच्या अभंगांतून त्यांचा आवाज मनामनांत कायमचा साठवून ठेवला जाणार आहे.
लता दीदींना २००१ साली संगीत क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरीबद्दल ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. पद्मविभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यांसह असंख्य पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. १९९२ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारनं लता मंगेशकर यांच्या नावाने लता मंगेशकर पुरस्कार नावानेही पुरस्काराचीही सुरुवात केली. तर मध्य प्रदेश सरकरानंही १९८४ सालापासून लता मंगेशकर पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली. जी अविरत सुरू आहे. लता दीदींच्या आयुष्याचा प्रवास जरी आज थांबला असला तरी दैवी सूरांमधून व सुमधुर आवाजातून भारतीयांच्या अंतकरणात दीदींनी लावलेला स्नेहदीप सदैव चैतन्यानं युक्त राहील.