माजलगाव- माजलगाव धरणाजवळ असलेल्या नदीपात्रात तब्बल 14 तास पुराच्या पाण्यात बाभळीच्या झाडाचा आधार घेत अडकलेल्या आजोबा व नातू यांना अखेर बुधवारी पहाटे 4 वाजता बचाव पथकाने सुखरूपपणे बाहेर काढले. पुराच्या पाण्यात तब्बल 14 तास अडकलेल्या आजोबा आणि नातू यांची बचाव पथकाने सुटका केली आहे.
माजलगाव धरणाच्या गेटच्या पायथ्याजवळ देवखेडा येथील रामप्रसाद गोविंद कदम यांचा जनावरांचा गोठा आहे. मंगळवारी ते गोठयात आपल्या 7 वर्षांच्या नातू शिवप्रसाद सचिन कदम याला घेऊन गेले होते. नदीपात्रात पाणी वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. मात्र, पाणीपातळी झपाट्याने वाढली. त्यामुळे ते तिथेच अडकून पडले. पाणीपातळी वाढल्याने त्यांनी नातवाला घेत बाभळीच्या झाडावर आश्रय घेतला. याबाबत प्रशासनास कळवण्यात आल्यानंतर तात्काळ बचाव पथकाला बोलवण्यात आले. पथकातील फायरमन पवन कराड बोट घेऊन गेले असता बोट पाण्याच्या प्रवाहात उलटली. बोट उलटल्यानंतर कराड यांनी एका झाडाचा आश्रय घेतला. या बचाव कार्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उमेश शिरके यांनी पुणे येथील एनडीआरएफच्या पथकांना पाचारण केले. बुधवारी पहाटे 4 वाजता या पथकाने बचावकार्य सुरू करून आजोबा-नातू व फायरमन कराड या तिघांना सुखरूप पाण्याबाहेर काढले.