भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना रात्री ईडीने अटक केली आहे. यामुळे खडसेंना मोठा धक्का बसला आहे.
भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी (Bhosari land scam) खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूल मंत्री पदही गमवावे लागले होते. यानंतर खडसेंना देखील ईडीने चौकशीला बोलावले होते. या चौकशीला खडसे सामोरे गेले होते. खडसे यांची मुलगी शारदा यांनादेखील ईडीने चौकशीला बोलावले होते. यानंतर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. काल दिवसभर गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली.
गिरीश चौधरी यांना ईडीने रात्री अटक केल्याचे आज सकाळी जाहीर केले. यामुळे आता एकनाथ खडसे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. झोटिंग समितीने आपल्याला क्लिन चिट दिल्याचे खडसे यांनी सांगितले होते. मात्र, पदाचा गैरवापर करून खडसे यांनी या जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. ही जमिन एमआयडीसीची होती असे नंतर समोर आले.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी १२ आमदारांचे निलंबन केल्यानंतरची ही भाजपाची प्रतिक्रिया आहे. असे काहीतरी होणारच होते. कारण ईडी ही भाजपाची प्रेयसी आहे. त्यांचा विरोधकांना नमविण्यासाठी वापर केला जातो. सीडी आता नाथाभाऊ समोर आणतील, त्याची वाट पाहूयात, असे सांगितले.