बीड

महादेव बडे यांच्या निधनाने मुंडे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता हरपला,पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोक भावना

बीड । दिनांक२३।
धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि डोंगरपट्टयातील धडाडीचे नेते महादेव बडे यांच्या निधनाने लोकनेते मुंडे साहेबांचा एक जीवाभावाचा सच्चा कार्यकर्ता आम्ही गमावला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

महादेव बडे यांचा स्वभाव मनमिळाऊ होता, ते खूप कमी बोलायचे. धारूर व परिसरातील तालुक्यात त्यांचा चांगला लोकसंग्रह होता, प्रत्येकांच्या अडी अडचणीला ते धावून जात. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. जिल्हा परिषद सदस्य, बाजार समिती अशा विविध पदांवर काम करतांना सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. वडवणी, धारूर भागातील लोकांचे प्रश्न घेऊन ते नेहमी माझ्याकडे येत असत, त्यांचा चेहरा डोळ्यासमोरून जात नाही. ” बोला मुकदम” असं मी त्यांना नेहमी म्हणायचे. ते प्रामाणिक व कष्टाळू असे व्यक्ती होते, त्यांचे असे अचानक जाणे हे अत्यंत वेदनादायी व दुःखद आहे अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!