बीड

बीड जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने पूर्ण वेळ उघडी ठेवा – सलीम जहाँगीर,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; केंद्राच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करून धान्य वाटप करा

बीड ( प्रतिनिधी ) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थींना धान्य वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांना पूर्णवेळ परवानगी द्या. स्वस्त धान्य वाटपाचे आदेश तातडीने द्यावेत अशी मागणी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने 15 मे 2021 रोजी एक सूचना जारी केली आहे . यानुसार रेशन दुकाने महिन्याचे सर्व दिवस खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून सदर सुचनेची बीड जिल्ह्यात तातडीने अंमलबजावणी करा असेही सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे.

बीड येथील भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, स्वस्त धान्य दुकानदारांच्या संपामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने बंद होती. आधीच लॉकडाऊन आणि त्यात रेशनचे धान्य न मिळाल्याने लाभार्थी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम ( एनएफएसए ) अंतर्गत केंद्र सरकारने गरीब कुटुंबांना प्रति व्यक्ती एक ते तीन रुपयांच्या दराने 5 किलो अन्नधान्य पुरवित आहे. याव्यतिरिक्त , प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ( पीएमजीकेवाय ) दोन महिन्यांसाठी ( मे आणि जून ) त्याच लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य विनामूल्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा गरिबांवर विपरीत परिणाम होऊ नये. या सूचनेनुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महिन्याचे सर्व दिवस स्वस्त धान्य दुकाने खुली ठेवण्यास आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यास सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने दि.15 मे रोजी काढलेल्या सूचनेनुसार बीड जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने महिन्यातील पूर्ण वेळ खुली ठेवण्याचे आदेश देवून लाभार्थ्यांना रेशनचे धान्य वाटप करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!