अंबाजोगाई (वार्ताहर)
राज्यात ज्यांचे पोट हातावर आहे,असे लाखोंच्या संख्येने असणारे बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार समाज बांधव यांना महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने कोरोना संकटाच्या काळात एक रूपयांची देखील मदत केलेली नाही.या वर्गाला जगणे मुश्किल झाले असून बहुतेकांची स्थिती आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेली आहे.किरायाच्या घरात राहून,तिथेच व्यवसाय करणे.रोज शंभर दोनशे रूपये मिळणारे ते पण आता मिळत नाहीत,हातून आता सारच गेलं असून जगणं मुश्किल झालं आहे.महाराष्ट्र सरकार कवडीची मदत करायला तयार नाही.ठाकरे सरकारने ठोस पावले उचलून त्यांना मदत करावी अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले की,मागच्या एक वर्षापासून महाराष्ट्र राज्यात बारा बलूतेदार आणि आठरा आलूतेदार समाज बांधवांची कोरोना संकटामुळे ससेहोलपट सुरू आहे.यांच हातावर पोट आहे.मात्र सर्वच उद्योग व व्यवसाय हे बंद पडल्याने उपासमार सुरू असून लॉकडाऊन काळात तर खाजगी सावकाराकडून घेतलेले पैसे आणि वसुलीचा तगादा,दुसरीकडे उद्योगधंद्याला कुलूप ज्यामुळे आर्थिक कोंडी झाली.एक वर्षापासून मरण यातना सहन करणा-या वर्गातील लोकांना साधी कवडीची मदत ठाकरे सरकारने दिलेली नाही.राज्यात लोहार,चांभार,सुतार,नाभिक,परीट,कुंभार,शिंपी,ज्योतिषी, कोळी,कासार,गोंधळी,नंदीवाले,पांगुळ,वासुदेव,बहुरूपी,गोसावी, घडशी,गवंडी,शिकलकरी,ठाकर,गारूडी, मसणजोगी,जंगम, सनगर,बेलदार,गुरव आदी समाज बांधव वर्गातील कुटुंबियांची अर्थव्यवस्था ढेपाळून गेली आहे.अनेकांच्या
लेकरा बाळांवर उपासमारीची वेळ आहे.लघुधंद्यासाठी तर अनेकांनी खाजगी सावकाराचे घेतलेले कर्ज आणि त्यांचा वसुलीचा तगादा त्यामुळे कोरोनाच्या संकटापेक्षा यांच्यावर हेच जास्त संकट आहे,सरकारने शेतक-यांची कर्जमाफी केली.(ती पण,सरसगट नाही.हा भाग वेगळा) पण,त्याच धर्तीवर राज्य सरकारने बारा बलुतेदार व आठरा आलुतेदार यांनी घेतलेल्या बँक कर्जाची माफी करावी अशी मागणी त्यांनी वेळोवेळी केली.यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची गरज आहे,कमी व्याजाने,जामिनीशिवाय कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे,शिक्षण,कृषी, कौशल्य विकास आदी ठिकाणी राखीव संधी देण्याची गरज,एकूणच समाजाच्या कल्याणा साठी कृती धोरणात्मक कार्यक्रम हाती घेवून त्यांना सहकार्य करावे अशी मागणी राम कुलकर्णी यांनी केली आहे.