महाराष्ट्र

..तर यंदा परिक्षेविनाच विद्यार्थी पास होणार? दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी


मुंबई, दि. 26 (लोकाशा न्यूज) : राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं असून वाढणार्‍या रुग्णसंख्येने ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढवली आहे, अशातच आता शाळा-कॉलेजमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने शिक्षण विभागाचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे पुढील काळात सरकार पर्यायी मार्गाचा विचार करणार असल्याचं विधान मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
अगदी काही महिन्यांवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा येऊन ठेपल्या आहेत, अशातच कोरोना रुग्णवाढीमुळे परीक्षेवर भीतीचं सावट आहे, या परीक्षा यंदा तरी होणार का? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे, परीक्षेवर योग्य पर्यायी मार्ग काढणार असल्याचं मंत्री विजय वडेट्टीवारांनी सांगितलं आहे, महत्त्वाचं म्हणजे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे आणि ऑनलाईन परीक्षा घेणे याबाबतही चाचपणी सुरू असल्याचं ते म्हणाले, टीव्ही 9 मराठीने याबाबत वृत्त दिलं आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात सध्या कोरोनाच्या आकडेवारीने गांभीर्य वाढलं आहे, राज्याच्या अर्थकारणाला पुन्हा लॉकडाऊन करणं परवाडणारं नाही, अशातच काही गोष्टींवर निर्बंध आणता येतील का याचा विचार सुरू आहे, यात लोकलच्या फेर्‍या कमी करणे, एसटी बसमधील गर्दी कमी करणे, सिनेमागृह-विवाहस्थळे येथे होणार्‍या गर्दीवर आळा घालणे यासारख्या गोष्टींवर विविध पर्याय शोधावे लागणार आहेत. येत्या काळात हे निर्णय लवकरच अपेक्षित असल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितले.

तामिळनाडूचा पॅटर्न महाराष्ट्र स्वीकारणार?
तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांनी 9 वी ते 11 इयत्तेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे, कोरोनामुळे लेखी परीक्षा घेणं शक्य नाही, त्यामुळे 2020-21 या शालेय वर्षात विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पास करण्यात येईल अशी घोषणाच मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तामिळनाडूत जे केलं तसेच महाराष्ट्रात होणार का? हे आगामी काळात स्पष्ट होईल.

वाशिमच्या निवासी शाळेत आढळले 229
विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
रिसोड तालुक्यातील देगाव येथील भावना पब्लिक स्कूल या निवासी शाळेतील कोरोनाबाधित आढळून आलेल्या 229 विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, या शाळेच्या वसतिगृहाची इमारत आता कोविड केअर सेंटर म्हणून जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी गुरूवारी घोषित केली. शाळा सुरु होण्यापूर्वी वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 229 विद्यार्थी तसेच 4 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

परीक्षा शुल्कमाफीची थकीत रक्कम मिळणार

राज्यात ज्या जिल्ह्यात दुष्काळ आणि इतर नैसर्गिक संकटे आली, तेथील विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून शासनाकडून परीक्षा शुल्क माफी मिळते. मात्र, मागील तीन वर्षांपासून या शुल्कमाफीची रक्कम विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून परत मिळाली नव्हती. मात्र, आता लवकरच राज्यातील दहावी आणि बारावीच्या तब्बल आठ लाख विद्यार्थ्यांना थकीत 21 कोटी 70 लाख रुपयांचे शुल्क परत मिळेल. यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!