बीड

महसूल हादरले, एसडीएम गायकवाड एसीबीच्या जाळ्यात ! 65 हजार रूपयांची लाच घेताना पकडले, जालना एसीबीची माजलगावात मोठी कारवाई


माजलगाव, दि. 18 (लोकाशा न्यूज) : माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी अवैध वाळूच्या गाड्या सुरू ठेवण्यासाठी आपल्या चालकामार्फत 65 हजार रूपयांची लाच घेतली. यावेळी चालक काळे यांना माजलगावच्या संभाजी चौकात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर काहीच वेळात गायकवाड यांना देखील त्यांच्या राहत्या घरून एसीबीने ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ही कारवाई जालना एसीबीने केली.
माजलगावात वाळूच्या अवैध गाड्या चालू ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी 65 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्या उपर जावून गायकवाड वाळूची गाडी सुरू होताच ती पकडून पुन्हा तहसिल कार्यालयात आणून लावत व ती सोडविण्यासाठी सुमारे दिड ते दोन लाख रूपयांची मागणी करत. याला कंटाळून तक्रारदाराने जालना एसीबी कार्यालयाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार गायकवाड यांनी गुरूवारी 65 हजार रूपयांची लाच आवल्या चालकामार्फत स्विकारताच चालकास संभाजी चौक येथे रंगेहाथ पकडण्यात आले तर लाचेच्या मागणीची खात्री झाल्यानंतर एसडीएम गायकवाड यांना त्यांच्या राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले. या दोघांनाही एसीबीच्या कार्यालयात आणण्याची प्रक्रिया सुरू होती. जालना येथील पथकामार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे महसूल विभागाचे धाबे दणाणले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!