महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावणार? -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई:-करोना विषयक सर्वत्र दाखविल्या जाणार्‍या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच करोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिले. मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादीत ठेवतानाच मास्क वापरणे बंधनकारक आहे. जे नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, टास्क फोर्सचे सदस्य आदी उपस्थित होते. जिल्ह्यांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या काही महिन्यांमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत घट आल्याने नागरिकांमध्ये बेफिकीरी वाढली आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधासाठीच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. लोकांमध्ये जरी शिथीलता आली असली तरी यंत्रणांमध्ये ती येऊ देऊ नका. नियमांची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
राज्यात सार्वजनिक ठिकाणी करोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आंदोलने, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये. विवाह समारंभामध्ये उपस्थितांच्या मर्यादेचे पालन केले जाते का याची यंत्रणेकडून तपासणी झाली पाहिजे. ज्या भागात रुग्णसंख्या वाढतेय तेथे कंटनेमेंट झोन करायची तयारी ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी ग्रामीण आणि शहरी भागात सार्वजनिक ठिकाणांचे, शौचालयांचे, बसस्थानके, उद्याने याठिकाणी निर्जंतुकीकरणाचे काम हाती घ्यावे. नियमांचे पालन करायचे की पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे याची निवड लोकांच्या हातात आहे. त्यामुळे पुढच्या काळात अधिकची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. करोना नियंत्रणासाठी जिल्ह्यांना जो निधी देण्यात आला आहे त्यातील शिल्लक असलेला निधी 31 मार्चपर्यंत वापरायला परवानगी देण्यात आली आहे,असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!