बीड

जिल्हास्तरीय स्पर्धेत ‘आवरगाव’ ठरले स्मार्ट ग्राम, गावाला मिळणार साठ लाखाचे पारितोषीक तर ‘त्या’ गावांची तालुकास्तरावरील स्मार्ट ग्राममध्ये झाली नोंद, 16 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री, जिल्हाधिकारी अन् सीईओंच्या हस्ते 11 गावांना बहाल केले जाणार सन्मानपत्र


बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. (आबा) पाटील यांच्या नावाने ‘स्मार्ट गाव’ योजना राबविण्यात येत आहे. तालुकास्तरावर स्मार्ट ठरलेल्या गावाला 20 लाखाचे तर जिल्हास्तरावरील गावाला 60 लाखाचे बक्षीस दिले जात आहे. त्यानुसार जिल्ह्यास्तरीय स्पर्धेत आवरगाव (ता.धारूर) हे गाव स्मार्ट ग्राम ठरले आहे. या गावाला शासनाकडून 60 लाख रूपयांचे पारितोषीक मिळणार आहे. इतर 11 गावांची तालुकास्तरावरील स्मार्ट ग्राममध्ये नोंद झाली आहे. तालुकास्तरावरील गावांना प्रत्येकी 20 लाख रूपयांचे बक्षीस मिळणार आहे. तत्पुर्वी या आकरा गावांना येत्या 16 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शिवकन्या सिरसाट, सीईओ अजित कुंभार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांच्यासह अन्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
गाव स्वच्छ रहावे, गावांचा विकास व्हावा याअनुषंगाने राज्य सरकार आर.आर.(आबा) पाटील या नावाने स्मार्ट गाव योजना राबवित आहे, सन 2019-20 मधील स्मार्ट गाव निवडण्यासाठी ह्या आठवडाभरात

जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरावरील स्मार्ट ग्राम निवडण्यात आली आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेत धारूर तालुक्यातील आवरगाव हे स्मार्ट ग्राम ठरले आहे. या गावाला स्पर्धेत 84 गुण प्राप्त झाले आहेत. त्यानुसार या गावाला राज्य शासनाकडून 60 लाखाचे बक्षीस मिळणार आहे. गावच्या सरपंच पद्मीनीबाई जगताप आणि युवा नेते अमोल जगताप यांच्या नेतृत्वात गावातील तरूणांनी स्वच्छेतेसाठी मोठी मेहनत घेतली, या सर्वांच्याच मेहनतीमुळे आज आवरगाव जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम आले आहे. वास्तविकत: पुर्वीपासूनच या गावाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे. याच गावातील स्व.रामराव आवरगावकर यांच्या रूपाने जिल्ह्याला एक सक्षम खासदार, एक आमदार, स्वातंत्र सैनिक, लोकल बोर्डाचा पहिला अध्यक्ष मिळाला, त्यांनी केलेल्या कार्याची संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्राला ओळख आहे. त्याचबरोबर याच गावातील स्वातंत्र सैनिक स्व. योगिरीज जगताप आणि स्व. भागवतराव नखाते यांच्या कार्यामुळेही गावाला मोठे लौकिक मिळालेले आहे. अगदी त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून सध्या अमोल जगताप हे काम करत असून आज जिल्हास्तरीय स्पर्धेत मिळालेले यश त्याचेच फलित आहे. जिल्हास्तरीय स्मार्ट गावाबरोबरच तालुकास्तरावरीलही स्मार्ट ग्रामही निवडण्यात आले आहे. तालुकास्तरावरील स्पर्धेत धारूर तालुक्यातील आवरगाव (गुण 84) गेवराई तालुक्यातील किनगाव (गुण 53), शिरूर तालुक्यातील खोकरमोहा (गुण 57), बीड तालुक्यातील ताडसोन्ना (गुण 71), आष्टी तालुक्यातील सराटेवडगाव (गुण 71), वडवणी तालुक्यातील बाहेगव्हाण (गुण 53), अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली (आ) (गुण 63), केज तालुक्यातील केवड ( गुण 51), माजलगाव तालुक्यातील शेलापुरी (गुण 61), परळी तालुक्यातील तपोवन (गुण 52) आणि पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी (गुण 64) गावाची निवड करण्यात आली आहे. यास्पर्धेसाठी सीईओ अजित कुंभार यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, ग्रामीण विकास यंत्रणेनेचे प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे, ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, प्रदिप काकडे, बांधकाम विभागाचे अभियंता हळीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार, वैजिनाथ आवाड, बी.एम.खेडकर, वाघमोडे, जटाळ, साळवे, पिंगळे या अधिकार्‍यांनी मोठी मेहनत घेतली, दरम्यान येत्या 16 फेब्रुवारी रोजी या सर्व स्मार्ट गावांना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शिवकन्या सिरसाट, सीईओ अजित कुंभार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांच्यासह अन्य अधिकार्‍यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तर पटकावलेल्या पारितोषीकाची रक्कम राज्य सरकारकडून मिळालानंतर ती एका मोठा कार्यक्रमात संबंधित स्मार्ट गावांना दिली जाणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!