मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी शिवसेना चांगलीच अडचणीत आलेली आहे. सत्तेत येऊन वर्ष होत नाही तोच नाजूक प्रकरणांतील तिसरे मोठे प्रकरण घडल्याने महाविकास आघाडीही मेटाकुटीला आली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमालीचे सावध झाल्याचे दिसत आहेत.
पूजा चव्हाण ही मुळची बीडच्या परळीची आहे. तिच्या आत्महत्येनंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या पूजासोबत बोलतानाच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कथित दहा-बारा क्लिपही व्हायरल झाल्याने राज्यभरात हा विषय तापलेला आहे. राठोड यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. यावर राठोड यांनी आपली बाजू मांडण्यासाठी उद्धव ठाकरेंची वेळ मागितल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, ठाकरे यांनी अद्याप त्यांना वेळ दिलेली नाही. तसेच फोनवरही बोलणे झालेले नाही. याउलट मातोश्रीवरून राठोड यांना तसेच अन्य नेत्यांना या प्रकरणावर प्रसारमाध्यमांमध्ये काहीच बोलू नये, असे आदेश गेलेले आहेत. आज सकाळीच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यामध्ये त्यांनी दोन दिवसांत पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातील तपासाची माहिती दिल्याचे समजते आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री गंभीर असून ते राठोड दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करू शकतात. यामुळे राठोड यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. दुसरीकडे पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री संवेदनशील; केवळ आरोपावरून कारवाई करणं चुकीचे आहे, असे माजी मंत्री आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.