बीड

घोळघाल्या वसतिगृहांना सीईओंचा दणका, बोगसगिरी करणार्‍यांच्या घश्यातून एक कोटी वाचविले, तपासणीतील विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून तीन महिण्याचे बिले काढली तर सोळा वसतिगृहांवर शिस्तभंगाचा उगारला हातोडा


बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : एखाद्या सर्जिकल स्ट्राईकप्रमाणेच सीईओ अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील हंगामी वसतिगृहांची तपासणी केली, पहिल्या टप्प्यात 239 वसतिगृहांची तपासणी करण्यात आली होती, यापैकी 228 वसतिगृहांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या, त्यानंतर त्यांना नोटीसा काढण्यात आल्या, तर त्या नोटीसांचे उत्तरही संबंधित वसतिगृह चालकांकडून आले, त्यानुसार आता सीईओ अजित कुंभार यांनी यामध्ये मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान हजर असलेले विद्यार्थी ग्राह्य धरूनच अनुदान अदा करावे असे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. या अनुदानापोटी जवळपास सहा कोटी 65 लाख 70 हजार रूपये तालुकास्तरावर वर्ग करण्यात आले आहे. हे अनुदान नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिण्यातील आहे, बोगसगिरी करणार्‍यांच्या घश्यातून सीईओंनी शासनाचे जवळपास एक कोटी रूपये वाचविले आहेत. या बरोबरच त्यांनी जिल्ह्यातील 16 वसतिगृह चालकांवर शिस्तभंगाचीही कारवाई केली आहे. त्यांच्या या कारवाईमुळे बोगसगिरी करणारांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत.
बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या कामगारांच्या पाल्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी दरवर्षी हंगामी वसतिगृह चालविले जातात, त्यानुसार यावर्षी जिल्ह्यात 283 वसतिगृह सुरू आहेत. या वसतिगृहातून केवळ आणि केवळ ऊसतोड कामगारांची सेवा व्हावी यासाठी सीईओ अजित कुंभार आणि शिक्षण विभागाचे वसतिगृहांवर करडी नजर आहे. यामुळेच अजित कुंभार यांनी अचाणक तपासणीचे आदेश काढले होते. त्यानुसार पहिल्या तपासणीत 239 वसतिगृहांची तपासणी झाली होती, यापैकी 228 वसतिगृहांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या, त्रुटी आढळल्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या, या नोटीसांवर 228 वसतिगृहांचे खुलासे शिक्षण विभागाला प्राप्त झाले, या खुलाश्यानंतर आता सीईओंनी मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान जी विद्यार्थी संख्या उपस्थित होती ती संख्या ग्राह्य धरून अनुदान देण्याचे आदेश सीईओंनी काढले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने वसतिगृहांचे डिसेंबर, नोव्हेंबर आणि जानेवारी असे तीन महिण्याचे सहा कोटी 65 लाख 70 हजार रूपये वितरीत केले आहेत. वास्तविक पाहता बोगसगिरी करणार्‍यांच्या घश्यातून सीईओंनी जवळपास एक कोटी रूपये वाचविले आहेत. याबरोबरच त्यांनी जिल्ह्यातील 16 वसतिगृहांवर शिस्तभंगाचा हातोडाही उगारला आहे. या दोन्ही कारवयांमुळे बोगसगिरी करणार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

आम्ही चांगलं काम करणार्‍यांच्या पाठीशी,
बोगसगिरी करणार्‍यांना माफी नाहीच – कुंभार

तपासणीत हजर असलेली विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून आम्ही वसतिगृह चालकांचे तीन महिण्यांचे अनुदान काढले आहे. यातून कोणावरही अन्याय होणार नाही, जे चांगलं काम करत आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, जे बोगसगिरी करत आहेत त्यांना मात्र आम्ही सोडणार नाही, असा ईशारा सीईओ अजित कुंभार यांनी दै. लोकाशाशी बोलताना दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!