बीड/प्रतिनिधी: जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधींच्या ठेवी गोळा करुन नंतर ठेंगा दाखविल्याचा प्रकार वर्षभरापूर्वी परळीत घडला होता. या प्रकरणी माऊली मल्टीस्टेटच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद झाला होता. यातील मास्टरमाईंड विष्णू भागवत याला सोमवारी (दि.८) आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक कारागृहातून ताब्यात घेतले.
परळीतील माऊली मल्टीस्टेट को -ऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेने जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवी गोळा केल्या होत्या. मात्र, मुदत उलटल्यानंतर ठेवी परत करण्यास टोलवाटोलवी करण्यात आली. २०१९ मध्ये मल्टीस्टेटने गाशा गुंडाळल्यावर ठेवीदारांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ठेवीदारांनी मल्टीस्टेटच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांना केवळ आश्वासने देण्यात आली. यात वर्ष उलटून गेलेे. अखेर ठेवीदार अरुण मुळे (रा.नक्षत्रवाडी, औरंगाबाद) यांच्यासह एकूण १४ ठेवीदारांनी परळी शहर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरुन ११ सप्टंेबर २०२० रोजी एकूण एक कोटी २८ लाख ६६ हजार ६९९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चेअरमन ओमनारायण जैस्वाल, सचिव संगीता ओमनारायण जैस्वाल आणि विष्णू रामचंद्र भागवत (राग़वंडगाव ता.येवला जि.नाशिक) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. हा गुन्हा तपासकामी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला. आर्थिक गुन्हे शाखेने चेअरमन ओमनारायण जैस्वाल याला औरंगाबादेतील वाळूज परिसरातून २२ जानेवारी रोजी अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून संगीता जैस्वाल फरार आहे. दरम्यान, तिसरा आरोपी विष्णू भागवत हा नाशिक कारागृहात होता. त्याला अंबाजोगाई न्यायालयाने 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.