बीड : अवकाळी पावसामुळे मराठवाडयासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी केंद्रीय पथक येत्या २० आणि २१ डिसेंबरला मराठवाड्यात येणार आहे. बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात हे पथक पोहोचणार आहे.
‘
महाराष्ट्रातील काही भागात परतीच्या पावसाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने केंद्राकडे मदतीची मागणी केली होती. त्यानंतर अखेर महिन्याभरानंतर केंद्राचे पथक बांधावर पोहोचणार असून माहिती घेतल्या नंतर केंद्राकडून काय मदत मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
केंद्रीय पथक २० आणि २१ डिसेंबरला मराठवाड्यात दाखल होणार आहे. हे पथक बीड, उस्मानाबाद भागातील नुकसानीची माहिती घेणार आहे. केंद्रीय पथक अतिवृष्टीने नुकसान झालेल्या खरीप हंगामाचे परीक्षण करणार आहे. परीक्षण केल्यानंतर हे पथक आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार असून त्यानंतर केंद्राकडून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल.