महाराष्ट्र

फक्त 2 दिवसच चालणार हिवाळी अधिवेशन, सरकार चर्चेपासून पळ काढतेय, भाजपचा थेट आरोप



मुंबई, दि. 3 (लोकाशा न्यूज) : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत  होणार आहे. विशेष म्हणजे येत्या 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबर दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनिल परब  यांनी दिली आहे. मात्र, सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा थेट आरोप भाजपनं केला आहे. विरोधीपक्षानं दोन आठवड्याची मागणी केली होती.
पहिला दिवस शोक प्रस्ताव ठेवला जाईल. त्यानंतर पुरवणी मागण्या मांडणे, दुसर्‍या दिवशी मागण्या मंजूर करणे असं कामकाज असेल, अशी माहिती परब यांनी दिली आहे. केवळ दोन दिवसांत हिवाळी अधिवेशन घेण्याच्या सरकारच्या या निर्णयाला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. अवघ्या 2 दिवसांचं अधिवेशन घेणे म्हणजे चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघाती आरोप विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे महाविकास आघाडी सरकारचं पहिलं आणि पावसाळी अधिवेशनही थोडक्यात गुंडाळावं लागलं होतं. त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनही अवघ्या 2 दिवसांचं घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दरम्यान, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे नागपुरात होत असतं. मात्र, नागपुरातील आमदार निवास हे क्वारंटाईन सेंटर करण्यात आले होते. तसंच कोरोना काळात सर्व यंत्रणा नागपूरला हलवणं शक्य नसल्यानं यंदाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!