मुंबई, दि. ४ (लोकाशा न्यूज) : मुंबईत सामान्यांसाठी लोकल सुरु करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ठाकरे सरकारकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारने मुंबईत लोकल सुरु करणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र लोकल सामान्यांसाठी सुरु नसल्याने सामान्य माणसांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. कल्याण, डोंबिवली या ठिकाणाहून मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस या ठिकाणी पोहचण्यासाठी ३ ते ४ तास लागतात. अत्यावश्यक सेवांसाठी काम करणाऱ्यांना लोकलने जाण्याची मुभा आहे. मात्र सामान्य प्रवाशांसाठी लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न कायम आहे. लोकल लवकर सुरु केली जावी अशी मागणी केली जाते आहे. मात्र अद्याप ठाकरे सरकारने प्रस्ताव दिला नसल्याचं उत्तर पियूष गोयल यांनी दिलं आहे.
सध्याच्या घडीला सामान्य प्रवाशांना ऑफिस गाठायाचं असेल तर दोन ते तीन तास प्रवासाचे हाल सहन करावे लागत आहे. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी यातून मार्ग काढावा लागतोय. अशात ऑक्टोबरच्या मध्यात मुंबई लोकल सामान्यांसाठीही सुरु केली जाईल असं ठाकरे सरकारकडून सांगण्यात आलं. दरम्यान केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना याबाबत विचारलं गेलं असता ठाकरे सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आता मुंबईतली लोकल सामान्यांसाठी कधी सुरु होणार हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे मुंबई लोकल सुरु होण्याबाबतचा संभ्रम कायम आहे.