मुंबई, दि. १४ (लोकाशा न्यूज) : मराठा आरक्षणाच्या अमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर राज्यात राजकीय आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी अध्यादेश काढण्याचा पर्याय सूचवला आहे. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. “शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही. ते ५० वर्षांपासून राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं नाही?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपवताना आरक्षणाच्या अमलबजावणीस तूर्तास स्थगिती दिली. त्यामुळे शैक्षणिक व नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मुद्दा पुढे आला आहे. त्यावरून विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका केली जात आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यादेश काढण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे.