बीड, 9 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. यावरून विविध मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा आरक्षण स्थगित होण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरलं जात आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात योग्य भूमिका घेतली नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
बीडमध्ये मराठा आरक्षण स्थगित झाल्याचे पडसाद उमटले आहेत. मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आदी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारचा तीन पायाची खुर्ची जाळून तीव्र निषेध केला. त्याचबरोबर राज्यभर पुन्हा एल्गार करण्यात येईल, असा इशारा देखील मराठा कार्यकर्त्यानी केला आहे.दरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी झाली. वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्यात आल्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे यावर निर्णय घेता येणार नाही, पण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.