महाराष्ट्र

2019-20 मध्ये दोन हजाराची एकही नवी नोट छापली नाही!


मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकने 2019-20 मध्ये दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांची छपाई केलेली नाही. यादरम्यान दोन हजारांच्या नोटांचा चलनातील वापर कमी झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या 2019-20 च्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
या अहवालानुसार, मार्च, 2018 च्या अखेरीस चलनात असेलल्या 2000 रुपयांच्या नोटांची संख्या 33, 632 लाख होती, मात्र मार्च, 2019 च्या अखेरपर्यंत त्यात घट होऊन 32, 910 लाखांवर आली. मार्च, 2020 च्या अखेरीस चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांची संख्या आणखी कमी होऊन 27, 398 लाखांवर आली. चलनातील एकूण नोटांमध्ये मार्च 2020 च्या अखेरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटांचा वाटा 2.4 टक्के राहिला. मार्च 2019 च्या अखेरीस हा वाटा 3 टक्के तर मार्च 2018 च्या अखेरपर्यंत 3.3 टक्के होता, असंही आरबीआयच्या अहवालात म्हटलं आहे.
अहवालात म्हटलं आहे की, 2019-20 मध्ये दोन हजारांच्या नोटांच्या छपाईसाठी कोणतीही ऑर्डर दिलेली नाही. भारतीय रिझर्व्ह बँक नोट प्रिंटिंग प्रायव्हेट लिमिटेड तसंच सिक्युरिटी प्रिटिंग अँड मींटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून दोन हजारांच्या नोटांची कोणतीही नवी पूर्तता झालेली नाही. 2019-20 मध्ये बँक नोटांची ऑर्डर मागील एक वर्षाच्या तुलनेत 13.1 टक्के कमी होती. रिझर्व बँकने म्हटलं की, 2019-20 मध्ये 500 च्या 1, 463 कोटी नोटांच्या छपाईची ऑर्डर दिली होती. यापैकी 1,200 कोटी नोटांची पूर्तता झाली आहे. तर त्याआधी म्हणजेच 2018-19 मध्ये 1,169 कोटी नोटांच्या छपाईच्या ऑर्डरपैकी 1,147 कोटी नोटांची पूर्तता करण्यात आली. ’2019-20 मध्ये बीआरबीएनएमपीएल तसंच एसपीएमसीआयएलला 100 च्या 330 कोटी नोटांच्या छपाईची ऑर्डर दिली होती. अशाच प्रकारे 50 च्या 240 कोटी नोटा, 200 च्या 205 कोटी नोटा, 10 च्या 147 कोटी नोटा आणि 20 च्या 125 कोटी नोटांच्या छपाईची ऑर्डर देण्यात आली. यापैकी बहुतांश नोटांची पूर्तता या आर्थिक वर्षात करण्यात आली.

2000 रुपयांच्या नोटांचा वाटा घटला
मूल्याच्या हिशेबानेही 2000 रुपयांच्या नोटाचा वाटा घटला आहे. आकडेवारीनुसार मार्च, 2020 पर्यंत चलनातील एकूण नोटांच्या मूल्यामध्ये 2 हजार रुपयांचा नोटांच्या वाट्यात घट होऊन 22.6 टक्के राहिला आहे. मार्च, 2019 च्या अखेरीस 31.2 टक्के आणि मार्च, 2018 च्या अखेरीस 37.3 टक्के होता.

500 आणि 200 रुपयांच्या नोटांमध्ये वाढ
2018 पासून तीन वर्षांत 500 आणि 200 रुपयांच्या नोटांच्या चलनात उल्लेखनीय वाढ झाली आहे. मूल्य आणि प्रमाण या दोन्हीच्या बाबतीत 500 आणि 200 रुपयांच्या नोटांचं चनल वाढलं आहे, असं रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

2019-20 मध्ये सुमारे तीन लाख बनावट नोटा सापडल्या

2019-20 मध्ये बँकिंग क्षेत्रात पडकल्या गेलेल्या बनावट नोटांपैकी 4.6 टक्के नोटा रिझर्व बँकेच्या स्तरावर पकडण्यात आल्या. तसंच 95.4 टक्के बनावट नोटांची माहिती इतर बँकांच्या स्तरावर मिळाली. एकूण 2,96,695 बनावट नोटा पकडण्यात आल्या, असंही रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटलं आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!