बीड,दि.20(लोकाशंा न्यूज): वाढत चालेल्या कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून सपूर्ण वाहतुकसेवा बंद करत देश लॉकडाऊन करत आंतरराज्य व राज्यांतर्गत एसटी बस सेवा बंद करण्यात आली होती. परंतू गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यात आली असून गुरूवारी बीडहून- औरंगाबादला जाणारी बस गाळा क्रमांक एकच्या समोर उभी आहे’. गेल्या कित्येक दिवसांपासून हे वाक्य प्रवाश्यांच्या कानावर पडलेच नव्हते. परंतू अखेर गुरुवारी सहा महिन्यानंतर पहिल्यांदाच बीड बसस्थानकात हा आवाज घुमला आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन करण्याचा निर्णय केंद आणि राज्य सरकारने घेतला. एसटी महामंडळाच्या बसेसही पूर्णत: बंद करण्यात आलेल्या होत्या. मध्यंतरी जिल्हाअंतर्गत एसटी बसेस सुरू केल्या होत्या मात्र संचारबंदी असल्यामुळे या एसटी बसेसच्या वाहतुकीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा बस बंद करण्यात आल्या. रात्री राज्य सरकारने राज्यात महामंडळाच्या बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाबाहेरही आता बसमध्ये प्रवास करता येणार असून गुरूवारी सकाळी बीडच्या डेपोमधून पहिली गाडी जिल्ह्याबाहेर औरंगाबादसाठी सोडण्यात आली तर जिल्हाअंतर्गत गेवराईला सोडली गेली. सोशल डिस्टन्स पाळून प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. वेळोवेळी लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे काही दिवस एसटी सेवा बंद ठेवण्यात आली. मात्र गुरूवारी सकाळी अंतरजिल्हा बस सोडण्यात आली. एका गाडीममध्ये 22 प्रवासी बसवण्यात आले. महामंडळाच्या या निर्णयाला बीड जिल्ह्यामध्ये अल्पसा प्रतिसाद मिळाला असल्याचे गुरूवारी दिसून आले. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने राज्य शासनाने राज्यभरात एसटी बसेसच्या वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळपासूनच येथील बसस्थानकात चालक, वाहकांसह एसटी बसेसची रेलचेल दिसून आली. गुरुवारी सकाळपासूनच पाऊस असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद काहीसा कमीच दिसून आला. मात्र, त्याही परिस्थितीत एसटीने आपली सेवा सुरू केली. बीड बसस्थानक परिसरात कतीतरी दिवसानंतर औरंगाबाद, सोलापूर,पंढरपूर, नांदेड आणि परभणीकडे जाणारी बस उभी असल्याचे अनाउंसमेंट ऐकावयास मिळाले.
बीड आगारातून गुरुवारी दिवसभरात 14 बसेस सोडल्या
औरंगाबाद चार, सोलापूर, पंढरपूर, नांदेड,परभणीसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे बीड आजारातून गुरूवारी बसेस रवाना करण्यात आल्या. तर जिल्हा अंतर्गत गेवराई चार, माजलगाव व परळीसाठी प्रत्येकी एक गाडी सोडण्यात आल्याची माहिती बीड आगार प्रमुख निलेश पवार यांनी दिली. कोरोनामुळे एसटी बसमध्ये 22 प्रवाशीच बसवण्यात येत आहेत. प्रत्येक सीटवर एक यापध्दतीने प्रवाशी बसवल्या जात आहेत. प्रवाशांना मास्क अनिवार्य असून सोशल डिस्टंसिंगचे पालनही करावे लागणार आहे.
मागणी असेल तर एसटी बसची व्यवस्था
एखाद्या ठिकाणाहून 20-22 प्रवाशी जाणार असतील, त्यांची मागणी असेल तर त्यांच्यासाठी एसटी बसची व्यवस्थाही करत त्यांना पाहिजे त्या ठिकाणी नेण्याची व्यवस्थाही करता येईल.
-निलेश पवार, आगार प्रमुख बीड