बीड :–जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग कमी करण्यासाठी केज, अंबाजोगाई, माजलगाव , आष्टी आणि परळी वै. या ५ शहरातील सर्व प्रकारच्या दुकानदारांचे, फळ-भाजी विक्रेत्यांचे, दूध विक्रेते, पेट्रोल पंपावरील व बँकामधील कर्मचारी यांचे कोरोनाचे अॅन्टिजन तपासणी(Antigen Test ) करण्यासाठी दि.18, 19 व 20 ऑगस्ट २०२० रोजी मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्या व्यक्ती रोज मोठ्या प्रमाणावर लोकांच्या संपर्कात येत असतात (सुपर स्प्रेडर्स ) यांची तपासणी भीलवाडा पॅटर्न प्रमाणे करणे आवश्यक असल्याने सदर आदेश राहुल रेखावार, अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी, बीड यांनी दिले आहेत. या ५ शहरांतील सर्व प्रकारची सर्व दुकाने दि.18, 19 व 20 ऑगस्ट 2020 रोजी बंद राहणार आहेत.
या शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी आजपर्यत नागरीकांनी मोठ्या प्रमाणात नियमांचे पालन केले आहे. सध्या शहरातील वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर दैनंदिन सर्वेक्षण चालू आहे आणि त्यातून अनेक संसर्ग झालेले रुग्ण संसर्गाचे गंभीर परिणाम होण्याआधीच रुग्णालयात दाखल करण्यात आणि पर्यायाने होणाऱ्या मृत्युंची संख्या कमी करण्यात खूप मदत होत आहे. त्यामुळे केज, अंबाजोगाई, माजलगाव , आष्टी आणि परळी वै. या शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने ही मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहेत.सदर सर्व नियोजन दुकानदार, पेट्रोल पंप चालक व बँकांच्या मदतीनेच करण्यात आले आहे. शहरातील दूध विक्रेत्यांनी नगरपालिकेच्या स्वच्छता निरिक्षकांद्वारे नेमलेल्या ठिकाणी तपासणीसाठी जायचे आहे आणि शहराबाहेरून येणाऱ्या दूध
विक्रेत्यांची तपासणी त्यांच्या गांवच्या ग्रामसेवकांनी त्यांना दिलेल्या ठिकाणी शहरातच करण्यात येणार आहे.सर्व प्रकारच्या दुकानदारांच्या संघटनां किराणा, कपडे, सराफा इत्यादी त्यांच्या सर्व सदस्यांची यादी, फोन नंबर सह दिलेली आहे. या संघटनाच्या सदस्यांव्यतिरिक्त इतर संबंधित दुकानदारांनी खालील तक्त्यातील प्रतिनिधींना फोन करुन
आपले नांव केवळ या तपासणीच्या कामासाठी दि.17 रोजी नोंदवण्यात येत आहेत.या नोंदणीनुसार प्रत्येकाला एक स्थळ आणि वेळ प्रतिनिधींमार्फत कळविण्यात येत असून बरोबर त्याच वेळी प्रत्येक दुकानदाराने तपासणी साठी यावे असे कळविले जाणार आहे. तपासणीचा निर्णय दुकानदारांना त्याच ठिकाणी एका तासातच कळविण्यात येईल. संपूर्ण
प्रक्रिया ही कोठेही गर्दी न होता आणि कोविड विषयक सर्व काळजी घेऊन करण्यात येणार आहे.तसेच या मोहीमेनंतर तपासणी झालेल्या दुकानांनाच दुकान उघडण्याची परवानगी राहील परंतु कोणत्याही दुकानदाराने विना परवानगी अशी कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये आणि संपूर्ण सहकार्य करावे व सर्व दुकानदारांनी आवर्जुन आपली तपासणी करुन घ्यावी. या अॅन्टिजन तपासणीद्वारे आपण केवळ स्वत:लाच नाही तर आपल्या परिवाराला, घरातील वृद्ध व मुलांना आणि आपल्या दुकानातील कर्मचाऱ्यांना व त्यांच्या परिवारांना सुद्धा सुरक्षित ठेवणार आहात यात शंका नाही. आणि या शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यास नागरिकांनी प्रशासनास मदत करावी असे आवाहनसुद्धा प्रशासनातर्फे यानिमित्ताने करण्यात येत आहे. या मोहिमेत ५ शहरांतील सर्व प्रकारच्या व्यावसायिक- दुकानदारांची जसे किराणा, कपडे, सराफा, किराणा रिटेल होलसेल, आडत ,सिड्स अँड फर्टिलायझर्स ,परमिट व दारु दुकाने ,मेडिकल, जनरल स्टोअर्स, नाभिक ,फोटो स्टुडिओ, फळ-भाजी विक्रेत्यांचे, दूध विक्रेते, पेट्रोल पंपावरील व बँकामधील कर्मचारी यासह सर्व प्रकारच्या विविध व्यवसायिकांची कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या संख्येने तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.