बीड, दि.14 : शहराच्या पश्चिमेस असणार्या चर्हाटा फाट्यावर आज सकाळापासूनच संबळ, हलकी अन घोषणाबाजीच्या दणदणाटात मराठा समन्वय समितीकडून आंदोलनाचा आक्रोश सुरु होता. आज राज्यभरात समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांच्या आदेशावरून ठिकठिकाणी जागरण गोंधळ आंदोलन होत आहे. बीड येथे देखील शिवसंग्रामी मावळ्यांनी घोषणाबाजी, काळे कपडे, काळ्या फिती घालत राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा जाहीर निषेध केला. यावेळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक देखील केली असून आंदोलनकर्त्यांनी प्रचंड नारेबाजी करत शासनाचा तीव्र निषेध केला यावेळी शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांनी समाजाच्या मागण्यांसाठी प्रसंगी जेल भोगू मात्र मागण्या मान्य करेपर्यंत आ.विनायक मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरूच राहील असे म्हंटले.
राज्यात महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाविषयी निष्काळजीपणा दाखवत आहे. सारथी बैठक सोडली तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, आणि त्याला सर्वस्वी अशोक चव्हाण जबाबदार आहेत. त्यांच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असलेले आरक्षण जाते कि काय अशी भीती निर्माण झाली आहे. ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मराठा समन्वय समितीकडून पुणे येथे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर मंत्रिमंडळ बैठकीत आत्मबलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याबाबत निर्णय झाला मात्र त्याची अमलबजावणी अद्याप सुरु झालेली नाही. यासोबतच राज्यातील आमदार, खासदारांना या मागण्यांबाबत निवेदने देणे सुरु आहे. आ.विनायक मेटे यांनी सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जाहीर केले होते. यानुसार पुणे येथे जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण राज्यात आज सोमवार रोजी दि १७ ऑगस्ट २०२० रोजी चर्हाटा फाटा, बीड येथे सकाळी ११ वाजता जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. चर्हाटा फाटा येथे झालेल्या या आंदोलनावेळी शिवसंग्राम कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. संबळ, डम्बरू, हलकी अन घोषणांनी सरकारचा निषेध नोंदण्यात आला. यावेळी शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, गेवराई तालुकाध्यक्ष कैलास माने, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे, उपजिल्हाध्यक्ष अक्षय माने, माजी नगरसेवक दत्तात्रय गायकवाड, विजय सुपेकर आदी पदाधिकारी – कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईचा जिल्हाभरातून निषेध होत असून सरकारचा निषेध देखील हे सरकार सहन करत नसल्याची भावना मराठा समाजात पसरली असून या कारवाईबाबत प्रचंड संताप समाजबांधव व्यक्त करत आहेत.