अंबाजोगाई । दि. ७ ।
गोपीनाथजी मुंडे आणि माझे नाते स्नेहाचे होते, म्हणूनच देशाने जेव्हा २०१४ मध्ये मला पहिल्यांदा सेवा करण्याची संधी दिली, त्यावेळी बीडमधून गोपीनाथ मुंडे विजयी झाल्यानंतर त्यांना दिल्लीमध्ये सोबत काम करण्यासाठी घेऊन गेलो होतो, मात्र नियतीने घात केला आणि मुंडेजी आपल्या सर्वापासून हिरावले गेले. मात्र आता दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मी ‘बेटी पंकजा” मुंडेंवर सोपवली आहे, त्यामुळे येत्या १३ तारखेला पंकजा मुंडे यांना आपण प्रचंड मताधिक्यांनी विजयी करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
भाजप महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आज कृषी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे, खासदार प्रीतमताई मुंडे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आदींसह जिल्ह्यातील सर्व आमदार, माजी आमदार, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, रासप, मनसेचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच परळी वैद्यनाथ, योगेश्वरी देवी संत भगवान बाबा संत नारायण महाराज यांना नमन करत असल्याचे सांगत बीडच्या आमचे दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनाही नमन करतो असे सांगत नरेंद्र मोदी यांनी देऊन घेत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत माझे ह्रदयाचे नाते होते, बीड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी ते माझ्याशी चर्चा करत. आज मला इथे आल्यानंतर त्यांची खूप आठवण येत आहे. माझे दुर्भाग्य हे राहिले की २०१४ मध्ये तुम्ही मला देशसेवेची पहिल्यांदा संधी दिली तेव्हा मी दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांना बीडमधून निवडून आल्यानंतर दिल्लीला माझ्यासोबत केंद्रात मंत्रीपदी विराजमान केले होते. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे माझ्यापेक्षा जास्त राजकारणाचा अनुभव होता, मात्र त्यांना आपल्याला गमवावे लागले. त्यांच्यासह अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर हे जवळचे सहकारी आपल्याला गमवावे लागले. ते नसल्याने त्यांची सतत कमतरता जाणवते अशी खंतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.
आशीर्वाद घेण्यासाठी आलोय
विकसित भारताच्या मिशनवर मोदी काम करत असून या संकल्पसह तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आज मी इथे आलो आहे. तुमच्या भविष्याला अधिक चांगले बनवण्यासाठी मी रात्रंदिवस काम करत आहे. तुम्ही सर्वजण माझा परिवार आहात. हक्काचे आरक्षण अडचणीत आले, असाच प्रयोग काँग्रेस सत्तेत आल्यावर देशभरात करू इच्छिते. परंतु मोदी जिवंत असेपर्यंत दलित, आदिवासी, ओबीसी आणि वंचितांचे आरक्षण कोणालाही हिसकावून घेऊ देणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस सोबत नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी काँग्रेस आहे तर आमच्या सोबत खरी राष्ट्रवादी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे असे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, स्वतःही काही करायचे नाही आणि इतरांनाही काही काम करू द्यायचे नाही हेच काँग्रेसचे आजपर्यंतचे धोरण राहिलेले आहे. मी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा काँग्रेसने त्याची चेष्टा केली, नंतर विरोध केला नंतर मात्र आम्ही हे काम वेगाने सुरू केले, तेव्हा त्यामध्ये आडवे येण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हे लोक सत्तेमध्ये आल्यानंतर कोणतेच काम होऊ देणार नाहीत त्यामुळे यांना बाजूला ठेवा एकविसाव्या शतकातील देश विकासासाठी भाजप एनडीए सरकारला प्रचंड बहुमताने विजयी करा. काँग्रेस जिथेही सत्तेत आली तेथे त्यांनी नुकसानच केले. महाराष्ट्र आणि मराठवाडा याचे अनुभव घेत आहे असे सांगत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.
मराठवाड्याच्या विकासाची जबाबदारी ‘बेटी पंकजा’ वर
महाराष्ट्रात आता आमचे सरकार योग्य पद्धतीने काम करत असून या सरकारने सिंचन योजना वेगाने पुढे नेली आहे. राज्यात आम्ही सिंचनाचे २७ प्रकल्प निवडले, त्यातील १० प्रकल्प आता पूर्णही झाले असून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजा जलसंजीवनी योजना सुरू केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र ती योजना रोखली होती, मात्र आता आम्ही पुन्हा ती योजना राज्यात सुरू केली आहे. मराठवाडा खर्या अर्थाने दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. मी गरिबीतून येऊन तुमच्या आशीर्वादाने पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलो शेतकर्यांचे दुःख मी जाणता, म्हणूनच शेतकर्यांना पिक विमा देण्याची गॅरंटी आम्ही दिली. दरवर्षी बीड जिल्ह्याला ५०० ते ७०० कोटी रुपयांचा विमा मिळतो. महाराष्ट्र सरकार शेतकरी सन्मान निधीतून दरवर्षी शेतकर्यांना सहा हजार रुपये देत आहे, मराठवाड्याचा विकास करणे ही भाजप एनडीए जबाबदारी समजतो, म्हणूनच आम्ही या भागात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांचे जाळे विणले. सुरत -अक्कलकोट, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या महामार्गासह नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग निर्माणाचे काम वेगाने सुरू आहे. ही सर्व कामे समोर ठेवून दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मी बेटी पंकजा मुंडे यांच्यावर दिली आहे असे ते म्हणाले.
बेटी पंकजाला प्रचंड बहुमताने विजयी करा
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजाताई मुंडे यांचा भाषणाच्या सुरुवातीलाच बेटी पंकजा असा उल्लेख केला. येत्या १३ तारखेला पंकजाताई मुंडे यांना मागील सर्व रेकॉर्ड मोडीत काढून तुम्ही सर्वजण प्रचंड मताधिक्याने निवडून देत संसदेत पाठवा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
अन् पंतप्रधानांनी खा.प्रीतमताईंच्या यांच्या डोक्यावर हात ठेवून दिला आशीर्वाद
व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वांना नमस्कार केला. यादरम्यान खासदार प्रीतमताई मुंडे त्यांना दिसल्या नाही, तेव्हा त्यांनी ‘प्रीतम कहा है’ अशी विचारणा पंकजा मुंडे यांच्याकडे केली. प्रीतम ताई सूत्रसंचालन करत असल्याचे पंकजाताई मुंडे यांनी सांगितल्यानंतर मोदीजींनी त्यांच्या भाषणाच्यावेळी प्रीतमताईंच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिले. या भावनिक क्षणाने उपस्थित भारावून गेले.