बीड

मतदार यादीच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, थेट गुन्हे दाखल होणार, जिल्हाधिकार्‍यांनी घेतली कडक भुमिका, यादीत मयत अन् दुबार नावे दिसत असल्याने कलेक्टरांनी व्यक्त केली तिव्र नाराजी, जिल्हा प्रशासनही लागले लोकसभा निवडणूकीच्या तयारीला, अंतिम मतदार यादी करताना सतर्कतेने काम करण्याचे दिपा मुधोळ यांचे आदेश


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी प्रसिद्ध करायची आहे. या कामी लक्ष घालून वगळणी करायची नावे तसेच नवनोंदणी सह दुबार यादी आदीबाबत सर्वांनी सतर्कता बाळगावी व हे वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी दिले. वास्तविक पाहता मतदार यादीच्या कामात जिल्हाधिकारी थोडाही हलगर्जीपणा खपवून घेणार नाहीत, यात थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. विशेष म्हणजे मतदार यादीत आढळून येत असलेल्या मयत आणि दुबार नावांमुळेही जिल्हाधिकार्‍यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार दि. 1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकवर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम कालावधी चालू आहे.  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी  उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, सर्व तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, सर्व निवडणूक नायब तहसीलदार व निवडणूक विभागातील कार्यरत कर्मचारी यांनी यांची आढावा बैठक घेऊन सदर कार्यक्रमांतर्गत पुनरीक्षण पूर्वक कालावधीत जुलै,ऑगस्ट दरम्यान घरोघरी सर्वेक्षण राबविण्यात आले होते. त्यामध्ये निश्चित केलेल्या, चिन्हांकित केलेल्या मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या तसेच दुबार मतदारांची नावे विहित कार्यपद्धती अवलंबून मतदार यादीतून वगळण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सदरील पुनरीक्षण पूर्व कालावधी तसेच तदनंतर प्रत्यक्ष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या कालावधीत सुद्धा ही कार्यवाही पुर्ण झाली नसल्याचे व अद्यापही मोठ्या प्रमाणात मयत तसेच दुबार मतदार यादी अंतर्भूत असल्याचे निदर्शनात येत असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  पुढील वर्षी लोकसभा निवडणुका तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार असून या निवडणुकांकरिता दोषविरहित व अचूक मतदार यादी उपलब्ध असणे आवश्यक आहे. दुबार, मयत व्यक्तींच्या यादीतील समावेशामुळे मतदानाच्या आकडेवारीची टक्केवारी चुकीची दिसते व त्यामुळे प्रत्यक्षात जास्त मतदार होऊ नये राज्याची टक्केवारी राष्ट्रीय टक्केवारी पेक्षा कमी असते. तसेच प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये दुबार नावाचा गैरफायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिनांक 1 जानेवारी 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विषय संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अनुषंगाने उपरोक्त प्रमाणे तात्काळ विहित मुदतीमध्ये कार्यवाही करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. तसेच सदरील कामकाजांमध्ये मतदार मतदान केंद्रास्त्रीय अधिकारी  (बीएलओ) यांना या सर्व  बाबी विचारात घेता मतदार यादी मधील दुबार, तसेच मयत व्यक्तींची नावे वगळण्याबाबत विहित कार्यपद्धती अवलंबून अशा मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी करणे आवश्यक आहे, असे निर्देश दिले. जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे सदरील कामी विलंब अथवा टाळाटाळ करतील. त्यांच्यावर सक्त कार्यवाही करण्याची तसेच मतदार नोंदणी अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंद करण्याबाबतची कार्यवाही अनुसरणे बाबत सूचना सदरील बैठकीमध्ये देण्यात आल्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!
Join WhatsApp Group