बीड, दि.15 (लोकाशा न्युज) ः- अंतरवाली सराटीत महासभेसाठी मराठा समाज लाखोंच्या संख्येने एकवटला होता. या दरम्यान सर्व जातीधर्मातील बांधवांनी सोशल मीडियासह प्रत्यक्षात सहकार्य केले, मात्र लोळगेने मराठा समाजाबद्दल असलेल्या द्वेषातून मराठ्यांच्या भावना दुखवणारी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यामुळे सोशल मीडियावर लोळगेचा निषेध केला जात असून रविवारी (दि.15) अॅड.राहुल वायकर यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश भरत लोळगे (रा.बीड) असे आरोपीचे नाव आहे. अॅड.राहुल मारोतीराव वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये हनुकाका यांनी ‘आम्ही मनोज जरांगे पाटलांसोबत बीड सराफा असोसिएशन बीड’ या नावाने पोस्ट टाकली. त्या पोस्टवर मंगेश लोळगेंनी कमेंट करत ‘हनुसेठ असे छुछुरे चाळे करु नका’ अशी पोस्ट करुन मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच हीच कमेंट बीडसह राज्यातील वेगवेगळ्या व्हॉट्सअॅपगु्रपवर शेअर केल्याचे दिसून आले. मराठा समाजाबद्दल खालच्या थराची भाषा वापरुन मराठा समाजाबद्दल द्वेष पसरवण्याचा व असंतोष निर्माण केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगेश लोळगेवर कलम 295 ए, 505 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास निरीक्षक केतन राठोड हे करत आहेत.