बीड

मराठा आरक्षणासाठी गेवराईच्या ३६ वर्षीय युवकाचा बळी,आंतरवाली येथील सभेदरम्यान मराठा युवकाचा उष्मघाताने मृत्यू, जरांगे पाटलांकडून पवार कुटुंबीयांचे सांत्वन

गेवराई : लोकाशा न्युज
अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे दि. १४ ऑक्टोबर रोजी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची विराट जाहीर सभा संपन्न झाली. या सभेसाठी पायी गेलेल्या गेवराईतील एका ३६ वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच मनोज जरांगे पाटील यांनी अंत्यविधीला उपस्थित राहुल श्रद्धांजली अर्पण केली.
विलास शिवाजीराव पवार (वय ३६) असे मयताचे नाव आहे. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे या प्रमुख मागणी साठी शनिवार दि.१४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी येथे जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. दरम्यान या सभेसाठी गेवराई येथील विलास शिवाजीराव पवार हा तरुण शहागड येथून पायी गेला होता. याठिकाणी त्याला जास्त प्रमाणात उलटीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्याने छोटा भाऊ गणेश याला कॉल करून माहिती दिली. यानंतर तातडीने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र गाड्यांच्या गर्दीने रुग्णालयात पोहचायला उशीर झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करुन सरकार विरुध्द मराठा समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. विलास पवार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि तीन मुली असा मोठा परिवार आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मनोज जरांगे पाटील यांनी अंत्यविधीला उपस्थित राहून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत श्रद्धांजली अर्पण केली.

चौकट

मराठा समाज पवार कुटुंबीयांच्या पाठीशी; कुटुंबाला उघड्यावर पडू देणार नाही – मनोज जरांगे पाटील

आंतरवाली येथे मराठा आरक्षणासाठी झालेल्या विराट सभेदरम्यान उष्मघाताने गेवराई येथील युवक विलास पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी रात्री उशिरा कळल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या अंत्यविधी बाबत माहिती घेऊन सकाळी ११ वाजता गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यविधीला उपस्थित राहून पवार यांच्या पत्नी व तीन मुली व कुटुंबियांची विचारपूस करत सांत्वन करुन तो फक्त तुमचा मुलगाच नसून माझा भाऊ होता असे समजून त्याला सर्वतोपरी मदत मिळवून देऊ, आपला समाज खूप मोठा आहे. या तीन मुलीचे शिक्षण व रक्षण ही समाजाची जबादारी असून आपला समाज तुमच्या कुटुंबियांना कधीच उघड्यावर पडू देणार नाही असे सांगून विलास यांचा छोटा भाऊ, आई, पत्नी व तीन मुलींसह सर्व परिवाराचे सांत्वन करत या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!