बीड

सेनेचे मराठवाडा सचिव विपूल पिंगळेंवर बीडमध्ये हल्ला


बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) : युवा शिवसेनेचे (उबाठा) मराठवाडा विभागीय सचिव विपूल पिंगळे यांच्यावर पाच ते सहा जणांनी हल्ला केला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास शिवाजी चौक (जिल्हा परिषदेच्या समोर) परिसरात घडली. यामध्ये पिंगळे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ बीडच्या शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बीड शहर ठाण्याचे प्रभारी ठाणेदार शिवाजी बंटेवाड यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात जावून पिंगळेंचा जबाब नोंदविला. या प्रकरणी बीड शहर ठाण्यात पाच ते सहा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

विपुल पिंगळे हे मागच्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत (उबाठा) धडाडीने काम करतात, त्यानउषंगानेच पक्षाने त्यांच्याकडे युवा शिवसेनेच्या मराठवाडा विभागीय सचिव पदाची जबाबदारी सोपविलेली आहे. रविवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास काही कामानिमित्त ते शहरातील जिल्हा परिषदेच्या समोर रोडवर आपल्या गाडीत थांबले होते, यावेळी त्यांच्या पाठीमागे एक क्रेटा (क्र. एम एच 23 बीसी 3787) गाडी होती, या गाडीचा चालकाने जोरजोराने हॉर्न वाजवण्यास सुरवात केली, त्यावर हॉर्न का वाजतात असे पिंगळे यांच्या चालकाने विचारले असता, पाच ते सहा जणांनी पिंगळेंच्या चालकास शिवीगाळ देण्यास सुरवात केली, हा सगळा प्रकार पाहूण पिंगळे गाडीतून खाली उतरले, त्यावर पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर दगडाने हल्ला केला, यामध्ये ते जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच बीड शहर ठाण्याचे प्रभारी ठाणेदार शिवाजी बंटेवाड यांनी जिल्हा रूग्णालयात जावून पिंगळेंचा जबाब नोंदविला आहे, याबाबत रात्री उशीरापर्यंत हल्लेखोरांवर बीड शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती, दरम्यान हल्ले खोरांनी नेमका कोणत्या कारणास्तव हल्ला केला हे मात्र रात्री उशीरापर्यंत समजू शकले नाही.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!