मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्याला पक्ष संघटनेत काम करण्यासाठी पद देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे बैठकीसाठी पोहोचल्याची माहिती देण्यात आली असून, अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे आमदार, जिल्हाध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ, खासदार अमोल कोल्हे अजितदादांच्या घरी पोहोचले आहेत. यासह अजित पवार यांच्या बंगल्यावर त्यांच्या समर्थक आमदारांनी हजेरी लावली आहे.
अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी पक्षातील आमदारांची मोर्चेबांधणी
अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी पक्षातील आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच आता जिल्हाध्यक्षही मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष लवकरच अजितदादा पवार यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. सध्या प्रदेशाध्यक्षपदी असलेले जयंत पाटील यांनी आपल्या पदाची पाच वर्ष दोन महिने इतका कालावधी पूर्ण केला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या राजघटनेनुसार एका व्यक्तीला एका पदावर तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राहता येत नाही. त्यामुळेच आता प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु झाली आहे. नवा प्रदेशाध्यक्ष निवडला गेला तर २०१९ ची महत्त्वाची निवडणूक ज्यांच्या कार्यकाळात लढली गेली ते सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुढे काय? जयंत पाटील यांना दुसरी जबाबदारी मिळणार की जयंत पाटील दुसरा मार्ग निवडणार हे लवकरच स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील समोर आलेला नाही.