सिरसाळा, दि. 18 (लोकाशा न्यूज) : अवैध वाळूच्या विरोधात रामेवाडी, बोरखेड, तेलसमुख, जळगव्हाण, पोहनेर ह्या गोदाकाठच्या गावाच्या लोकांनी आक्रमक भूमीका घेतल्याने हजार ब्रास अवैध वाळू साठ्यावर कार्यवाही झाली, परंतु परळीचे महसुल प्रशासन या बाबत फारशे गांभीर्याने घेत नाही म्हणून ह्या लोकांमध्ये प्रशासना विरुद्ध रोषाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर यांनी रामेवाडी येथे धाव घेतली, अवैध वाळू साठवणूकीच्या ठिकाणी पाहणी करुन उपस्थित रामेवाडी, बोरखेड, तेलसमुख, जळगव्हाण, पोहनेरच्या ग्रामस्थांशी संवाद साधला. वाळू माफिया पासून लोकांना कसा त्रास होते याची कैफियत ग्रामस्थांनी मांडली. सविस्तर कैफियत ऐकूण घेत अवैध वाळू विरुद्ध कार्यवाहीच्या सुचना पोलिस प्रशासनास दिल्या. या वेळी परळीचे तहसिलदार अलिनवार, सपोनि संदिप दहिफळे, शेतकरी संघटनेचे नेते कालिदास अपेट, बीआरएसचे अॅड माधवराव जाधव, प्रतिष्ठीत ग्रामस्थ प्रभाकर राव पौळ, राजाभाऊ चाचा पौळ, पोहनेरचे विष्णू रोडगे, बोरखेडचे विक्रम मिसाळ, प्रभाकर कदम, पंडितराव कदम,बालासाहेब कदम यांच्या सह अनेकजण उपस्थित होते. दरम्यान यावेळी प्रशासनाने जवळपास एक हजार ब्रास वाळू जप्त केल्याचे संकेत आहेत. यामुळेच अवैधपणे वाळू उपसणार्यांची झोप उडाली आहे.
महिलाही झाल्या व्यक्त :
रामेवाडी येथील महिला अवैध वाळूच्या मुद्यावर अ.पो. अधीक्षक कविता नेरकर यांच्या समोर व्यक्त झाल्या. गोदाकाठचे असुन आम्हाला साधे चार पत्राचे घर बांधायला वाळू मिळत नाही आणि काही लोक अशा प्रकारे वाळूचे ढिगारे घालून ठेवतात,काय करतय सरकार ? असा सवाल करत अवैध वाळू उपशाचा होणारा त्रास त्यांनी व्यक्त केला. या वेळी अपोअ नेरकर यांनी देखील गांभीर्याने महिलांचे म्हणने एकून घेतले.
शासकीय योजनांच्या कामांना जाणार वाळू – तहसीलदार
या वेळी उपस्थित तहसीलदार अलिनवार यांनी सांगितले कि, सदर अवैध वाळू आता रितसरपणे शासकीय प्रक्रियेतून जलजीवन अथवा शासकीय योजनांच्या कामास दिली जाणार आहे. गोदाकाठच्या गावातही कोणती शासकीय योजनेची कामे सुरू असतील तर ही वाळू रितसर प्रक्रिया करुन दिली जाईल. प्रशासनाकडे चलन भरावे लागणार आहे असल्याचे अलिनवार यांनी म्हटले आहे.