बीड: राज्याच्या शिक्षणक्षेत्राला काळ्याकुट्ट अंधाराच्या खाईत लोटून भ्रष्टाचारी मार्गाने अमाप माया जमवण्याच्या उद्देशाने प्रशासनात भरती झालेल्या विशेष करुन शिक्षण खात्यातील अधिकार्यानी शिक्षणाचा बाजार करुन टाकला असतांनाच बीड जिल्ह्यातील अनेक आश्रम शाळा व ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी चालवण्यात येणार्या शाळांच्या कार्यप्रणालीमध्ये गैरप्रकार असतांना त्या बाबतीत अनियमित्तता केल्या प्रकरणी बीडचे प्रभारी साह्यक समाज कल्याण आयुक्त डॉ.सचिन मडावी यांना राज्य शासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे.
या बाबतची सविस्तर माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील अनेक आश्रम शाळा व ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी चालवण्यात येणार्या शाळांच्या गैरकारभाराच्या तक्रारीच्या चौकशा चालू असतांना बीडचे साह्यक समाज कल्याण आयुक्त डॉ सचिन मडावी यांनी सम्बधित संस्थाचालकांना अर्थपुर्ण व्यवहाराने पाठीशी घालून कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या कारभारातअनियमित्तता स्पष्ट झाल्यामुळे त्यांना निलंबित करुन त्यांना बीड येथील आयुक्त,जातपडताळणी पथक येथे मुख्यालय देण्यात आले आहे. केज येथील ऊसतोड मजूर विकास मंडळाचे अध्यक्ष तथा साने गुरुजी ऊसतोड मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक उद्धव माणिकराव कराड यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या कारवाई नंतर साह्यक समाज कल्याण आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी तडकाफडकी निलंबित करण्याची कर्तव्य दक्षता दाखवली होती.