बीड, दि. 4 (लोकाशा न्यूज) : येथील ‘जिल्हा क्रिडा संकुलचे छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल’ असे तात्काळ नामकरण करावे, अशी सुचना आणि लाखो शिवप्रेमींच्या भावना खा. प्रीतमताईंनी जिल्हाधिकार्यांकडे एक पत्र पाठवून मांडल्या आहेत. 3 मार्च रोजी त्यांनी केलेल्या या सुचनेनुसार नक्कीच जिल्हाधिकारी पुढाकार घेतली आणि जिल्हा क्रिडा संकुलचे छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल असे नामकरण होईल, असा विश्वास आता सर्वांना वाटू लागला आहे.
एक फेब्रुवारी 1996 रोजी बीड शहरातील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुलचे नामकरण झाले होते. परंतू अद्यापर्यंत या क्रिडा संकुलला कागदोपत्री छत्रपती शिवरायांचे नाव देण्यात आलेले नाही, यामुळे लाखो शिवप्रेमींच्या मनात व्देषाची भावना आहे. त्याअनुषंगाने लाखो शिवप्रेमी आणि जनतेच्या मागणीनुसार सदरील बाब गांभीर्याने घेवून जिल्हा क्रिडा संकुलचे नामकरण अधिकृतरित्या कागदोपत्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकूल असे करण्यात यावे, अशी मागणी खा. प्रीतमताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याकडे केली आहे.