दक्षिण आफ्रिकेतील मालिका पराभवानंतर भारताला अजून एक मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. या सर्व गोष्टीमुळे भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विश्वचषकानंतर विराटने ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही लांब करण्यात आले. आता दक्षिण आफ्रिकेतील मालिकेनंतर कोहलीने कसोटी संघाचेही कर्णधारपद सोडले आहे.
दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात विराटच्या नेतृत्वाखाली भारताने विजय मिळवला होता. दुसऱ्या कसोटी सामन्याच विराट दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्यामुळे विराटच्या जागी लोकेश राहुलला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. राहुलच्या नेतृत्वाखाली भारताला दुसऱ्या कसोटीत पराभव पत्करावा लागला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत झाली होती. तिसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीने पुनरागमन केले होते. कोहलीने पहिल्या डावात एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळीही साकारली होती, पण त्याला यावेळी शतक झळकावण्यात अपयश आले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये कोहलीला एकही शतक झळकावता आलेले नाही. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्याच दिवशी अखेर भारताला पराभव पत्करावा लागला आणि मालिकाही १-२ अशी गमवावी लागली. या मालिकेनंतर भारतीय संघ श्रीलंकेबरोबर खेळणार आहे आणि ती कोहलीची शंभरावी कसोटी असणार आहे. पण कोहली यावेळी आपल्या शंभराव्या कसोटी सामन्यात संघाचा कर्णधार मात्र नसेल. कोहलीच्या जागी आता कोणाकडे कसोटी संघाची धुरा सोपणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.