बीड-येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर प्रशासक नेमण्यात आल्यानंतर बँकेचे संस्थापक असलेल्या सुभाष सारडा यांच्या अडचणी सातत्याने वाढतच असून शनिवारी बँकेतील जुन्या गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या तत्कालीन संचालकमंडळाविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. यासंदर्भात उच्च न्यायालयानेच थेट पोलीस अधीक्षकांना शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर या साऱ्या प्रक्रियेला शुक्रवारी रात्रीच वेग आला होता. अखेर शनिवारी यात गुन्हे दाखल झाले.
बीड येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेशी संबंधित वाद थांबायला तयार नाहीत. काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार मंत्री बँकेवर राज्य सरकारने प्रशासक नेमला होता. त्याचवेळी संचालक मंडळाच्या काळातील काही व्यवहार चुकीचे असल्याचा ठपका ठेवत प्रशासकांनी गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. काही कर्ज वाटपामध्ये बँकेच्या सहसंचालक मंडळाने नियमांचे पालन न केल्याचा ठपका आहे. मात्र मागच्या काही काळात ही प्रक्रिया थंडावली होती. त्यानंतर सदर प्रकरण उच्च न्यायालयात गेले. यावर उच्च न्यायालयाने थेट बीडच्या पोलीस अधीक्षकांनाच शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर या प्रकरणात वेगाने चक्रे फिरली असून शनिवारी सकाळी याप्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुभाष सारडा यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाला यापूर्वीच बडतर्फ करण्यात आलेले आहे तर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधेशाम सोहनी यांना प्रशासकांनी निलंबित केलेले आहे.