मुंबई:राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत आहे. या पदासाठी राष्ट्रवादीच्या माजी आमदार व प्रवक्त्या विद्या चव्हाण तसेच माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार यांची नावेही चर्चेत होती. मात्र, चाकणकर यांचे नाव अंतिम करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत अधिकृत माहिती अद्याप पक्षातर्फे देण्यात आलेली नाही. दरम्यान, याआधी विजया रहाटकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या.
महामंडळ वाटपात राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळावं, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. या पदावर राष्ट्रवादीने दावा सांगितला असून त्यात काही आडकाठी येईल, अशी शक्यता दिसत नाही. मुख्य म्हणजे मंत्रिमंडळ खातेवाटपात महिला आणि बालकल्याण खातं काँग्रेसकडे गेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या दाव्याला अधिक बळकटी मिळालेली आहे. त्यात गेल्या दीड वर्षापासून राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त असल्याने राष्ट्रीय महिला आयोगाने नाराजीही व्यक्त केली आहे. मुंबईतील साकीनाका भागात महिलेची बलात्कार करून हत्या करण्यात आली. त्याचवेळी राज्यात महिला अत्याचार व कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनाही वाढत आहेत. अशावेळी हे पद रिक्त असणं ही गंभीर बाब असल्याचेही राष्ट्रीय महिला आयोगाचे मत आहे. अशावेळी अधिक विलंब न लावता राज्य महिला आयोगाला नवा अध्यक्ष देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
राष्ट्रवादीने या पदासाठी रुपाली चाकणकर, विद्या चव्हाण आणि चंद्रा अय्यगार या तीन नावांचा विचार केला आणि त्यातून आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर या महिलांच्या प्रश्नांवर नेहमीच आक्रमक राहिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनेही झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी सक्षम करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. दौंडमधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रुपाली चाकणकर यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा राहिला आहे. लग्नानंतर त्या चाकणकर कुटुंबाच्या सदस्य झाल्या आणि चाकणकर कुटुंबाला राजकीय पर्श्वभूमी असल्याने राजकारणात उतरत त्यांनी यशही मिळवलं. नगसेविका ते राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा असा त्यांच्या यशाचा आलेख चढता राहिला आहे.