माजलगाव – गेवराई तालुक्यातील होणानाईक तांडा येथील मीना संतोष राठोड वय 28 वर्ष या विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि. 10 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. परंतु घटनेच्या क्रमावरून तसेच माहेरच्या लोकांनी केलेल्या आरोपांवरून आत्महत्या की हत्या असा संशय व्यक्त होत आहे. पिरुनाईक तांडा राजेगाव येथील मीना पंडित जाधव हिचे सन 2010 मध्ये होणानाईक तांडा टाकरवन येथील संतोष राठोड याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर मीना हिस 2 अपत्ये झाली. त्यातील मोठा मुलगा 9 वर्षांचा तर लहान 7 वर्षांचा आहे. शुक्रवार दि. 10 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान मीना हिने विषारी औषध पिले म्हणून पती संतोष राठोड याने तालखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले परंतु परिस्थिती गंभीर असल्याने तात्काळ तेथून हलविण्यास सांगितल्याने मीना हिस माजलगाव येथील खाजगी दवाखान्यात आणण्यात आले परंतु येथे आल्यानंतर डॉक्टरांनी तीस मृत घोषित केले. तेथून ग्रामीण रुग्णालय माजलगाव या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता मृतदेह आणण्यात आल्या नंतर माहेरकडील लोक दवाख्याण्यात येताच पती संतोष राठोड याने येथून पोबारा केला त्यामुळे नक्कीच काहीतरी वेगळेच घडल्याचा संशय मुलीच्या आई वडिलांना आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. येथील ग्रामीण रुग्णालयात शनिवारी दुपारी 12च्या दरम्यान मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान सदर महिलेचे वडील पंडित थाउजी जाधव व आई कौसाबाई जाधव यांनी आपल्या मुलीची हत्याच केली असल्याचा आरोप करीत हंबरडा फोडला. यावेळी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. सदर घटनेत पंचनामा व इतर माहिती घेणे सुरू असून नेमका काय प्रकार आहे हे शवविच्छेदनातून समोर येईल असे ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपी आय निलेश इधाटे यांनी सांगितले तर शवविच्छेदन झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाहीत असे म्हणून नातेवाईक अडून बसल्याने पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली होती.