केंद्र सरकारने शुक्रवारी खेळांशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे. या निर्णयाची घोषणा करताना मोदी म्हणाले की, हा पुरस्कार आपल्या देशातील लोकांच्या भावनांचा आदर करेल. ध्यानचंद हे भारताचे पहिले खेळाडू होते, ज्यांनी देशाला सन्मान आणि गौरव दिला. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार त्यांच्या नावावर असावा.
1991-92 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची स्थापना करण्यात आली
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारतीय खेळातील सर्वोच्च पुरस्कार आहे. 1991-92 मध्ये सरकारने या पुरस्काराची सुरुवात केली होती. विजेत्या खेळाडूला प्रशस्तीपत्र, पुरस्कार आणि 25 लाख रुपये दिले जातात. पहिला खेल रत्न पुरस्कार प्रथम भारतीय ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला होता. आतापर्यंत 45 लोकांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अलीकडेच क्रिकेटपटू रोहित शर्मा, पॅरालिम्पियन हाय जम्पर मरिअप्पन थंगावेलू, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पैलवान विनेश फोगाट यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
3 हॉकीपटूंना मिळाला खेलरत्न पुरस्कार
आतापर्यंत 3 खेळाडूंना हॉकीमध्ये खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यात धनराज पिल्ले (1999/2000), सरदार सिंह (2017) आणि राणी रामपाल (2020) यांचा समावेश आहे.
ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटले जाते
मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी प्रयागराज येथे झाला. भारतात हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंद वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी भारतीय सैन्यात भरती झाले. ड्युटीनंतर ते चांदण्याच्या प्रकाशात हॉकीचा सराव करायचे, म्हणून त्यांना ध्यानचंद म्हटले जाऊ लागले. त्याच्या खेळामुळे भारताने 1928, 1932 आणि 1936 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदके जिंकली. 1928 च्या अॅमस्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सर्वात जास्त 14 गोल केले. मग एका स्थानिक वृत्तपत्राने लिहिले, ‘हा हॉकी नाही, जादू होती आणि ध्यानचंद हा हॉकीचा जादूगार आहे.’ तेव्हापासून त्यांना हॉकीचे जादूगार म्हटले जाऊ लागले.