बीड धारूर

‘त्या’ महिलेची आत्महत्या नव्हे, तो हुंडाबळी; पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल

धारूर: तालुक्यातील तेलगाव साखर कारखाना परिसरात शुक्रवारी (२३ जुलै) सकाळी एका २४ वर्षीय महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता.  दरम्यान, सदर महिलेने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप मयत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला होता. अखेर या प्रकरणी सैन्यदलात जवान असलेल्या पतीसह, सासरा, सासू, दीर, जाऊ आणि नणंदेवर हुंडाबळीच्या कलमान्वये दिंद्रुड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.
शिवकन्या ज्ञानेश्वर आडे (वय २४ वर्ष) मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती ज्ञानेश्वर आडे हा सैन्यात जवान आहे. शिवकन्या व ज्ञानेश्वर हे दोघेच गुरुवारी शेतामध्ये गेले होते. दरम्यान पत्नी अचानक गायब झाल्यामुळे ज्ञानेश्वरने सर्वत्र शोध घेतला. एका विहिरीत तिने उडी मारल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी विहिरीतील गढूळ पाणी तीन मोटर लावुन पाणी उपसा करण्यास सुरुवात केली. तेंव्हा शुक्रवारी सकाळी १० शिवकन्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. शिवकन्याने आत्महत्या केली नसून सासरच्या लोकांनी तिचा खून केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केल्याने पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर शुक्रवार रात्री उशिरा दिंद्रुड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरुन शिवकन्याचा पती ज्ञानेश्वर आडे याच्यासह त्याचे वडील, आई, भाऊ, भावजय, बहिण या सहा जणांवर कलम ३०४(ब), ४९८(अ), ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोउपनि. विठ्ठल शिंदे यांनी दिली असून प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. प्रभा पुंडगे करीत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!