महाराष्ट्र कोकण

मुख्यमंत्री ​​उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये

मुंबई : कोकणात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. चिपळूण, महाड, खेड तालुक्यात महापूरानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडे महाड तालुक्यातील तळीये गाव दरड कोसळल्यामुळे उद्ध्वस्त झालं आहे. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 43 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. तर अजून 45 लोक बेपत्ता असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावातील विदारक स्थितीची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्या चिपळूणच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही उद्या कोकण दौरा जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणची पाहणी करणार आहेत. 
चिपळूणमध्ये महापुरानं हाहा:कार माजला आहे. संपूर्ण बाजारपेठ, एसटी स्टॅन्ड, शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं आतोनात नुकसान झालं आहे. पाणी ओसरल्यानंतर आता नागरिकांकडून साफसफाई केली जात आहे. मात्र, ते करत असताना आपलं सर्वस्व गमावल्याचं चिपळूणकरांना पाहायला मिळत आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चिपळूणच्या पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्री चिपळूणला पोहोचतील. तिथे चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाची पाहणी ते करतील चिपळूणची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेण्यासाठी जाणार आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंही कोकण दौऱ्यावर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चिपळूणच्या दौऱ्यावर जाणार असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणेही उद्या कोकणाच्या दौऱ्यावर जाणार आहे. राणेंच्या मंत्रालयाकडून तसा कार्यक्रमा जाहीर करण्यात आला आहे. नारायण राणे आज रात्री 8.50 वाजता दिल्लीवरुन मुंबईला पोहोचतील. त्यानंतर ते उद्या सकाळी 10 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने तळई गावची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. दुपारी 12 वाजता रायगडवरुन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील नुकसानाची पाहणी ते करणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता ते खेडवरुन चिपळूणला पोहोचतील आणि पुढे रत्नागिरीकडे रवाना होतील. यावेळी राणे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही असणार आहेत.

रामदास आठवलेही तळई गावाला भेट देणार
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही उद्या तळई गावातील परिस्थितीची पाहणी करणार आहेत. तशी माहिती आठवले यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या राज्यातील 4 मोठे आणि महत्वाचे नेते कोकणच्या पाहणी दौऱ्यावर असणार आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!