कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात (Maharashtra rain) पावसानं थैमान घातले आहे. मुंबई, (mumbai) ठाणे, (thane) सातारा आणि कोकणात (konkan rain) झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनेमध्ये राज्यात 121 जणांचा मृत्यू झाला आहे. पुढील 3 दिवस कोल्हापूर, पुणे रायगड, पालघर मुंबई आणि ठाण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मदत पुनर्वसन मंत्री विजय वेडट्टीवार यांनी दिली.
विजय वेडट्टीवार यांनी आपत्ती ग्रस्त भागाची सद्यस्थिती जाणून घेतली. त्यानंतर न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना परिस्थितीची माहिती दिली. राज्यातील वेगवेगळ्या भागात पावसामुळे परिस्थितीत बिकट आहे. पुणे, सातारा कोल्हापूर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाबळेश्वरमध्ये मागील 48 तासात 1074 मिली पाऊस झाला आहे. कृष्णा, कोयना, सावित्री आणि वेनाला पूर आला आहे. एका दिवसात कोयना धरणात 17 टीएमसी पाणी वाढ झाली आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.अलमट्टी धरणातून अडीच लाख क्यूसेक्स पाणी सोडलं जातंय आहे. तसंच, रायगड, पालघर. मुंबई ठाणे, पुणे सातारा, कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूरग्रस्तभागात एनडीआरएफच्या 14 टीम दाखल झाल्या आहेत. नौदल, आर्मी आणि कोसगार्ड सुद्धा दाखल झाले आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. राज्यावर आलेल्या अस्मानी संकटाच्या परिस्थितीत राज्यात 121 जणांचा मृत्यू झाला आहे. तर रायगड, साताऱ्यामध्ये झालेल्या दुर्घटनेत 57 जणांचा मृत्यू झाला असून 45 जण बेपत्ता आहे. 4660 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर रत्नागिरी कॅम्पमध्ये 2 हजार जण आहेत, अशी माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.दरम्यान, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला तसेच बचाव मदत कार्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दरड कोसळण्याच्या झालेल्या दोन दुर्घटनेतील मृतांबाबत शोक व्यक्त करून अशा प्रकारे डोंगर उतारांवरील गावे व वस्त्या येथील रहिवाशांनी प्रशासनास स्थलांतर करण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले. पुढील दोन ते तीन दिवस हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन प्रशासन आणि नागरीक यांनी दक्षता घ्यावी तसेच समन्वयाने यंत्रणांनी काम करावे, असेही निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.