नेकनूर, दि. 29 (लोकाशा न्यूज) : लिंबागणेश येथील तरुणाचा खून करून त्याच्या बुलेट गाडीसह त्याचा मृतदेह मांजरसुंबा घाटात रस्त्याच्या कडेला टाकून हा अपघात असल्याचा देखावा करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र नेकनूर पोलिसांनी ही घटना घडून चोवीस तासाच्या आत एका आरोपीला बेड्या ठोकून अटक केली आहे, ही घटना सोमवारी 28 जून ते 19 जून च्या मध्यरात्री घडल्याचे समोर येत आहे. दरम्यान हा खून नातलगानेच केल्याचे समोर येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की लिंबागणेश येथील 25 वर्षीय तरुण निलेश शहादेव ढास या तरुणाचा कोणीतरी डोक्यामध्ये काही तरी जोरदार शस्त्राचा वार करून त्याचा खून करून, हा खून नसून अपघात आहे हे दर्शविण्यासाठी त्या तरुणाचा बुलेटसह त्याचा मृतदेह मांजरसुंबा येथील घाटामध्ये रस्त्याच्या बाजूला फेकून दिला. हा अपघात झाला आहे असे दर्शविण्यासाठी आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेले. परंतु ही माहिती नेकनूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे व त्यांचे सहकारी अमोल नवले, दीपक खांडेकर, राठोड त्याच बरोबर बीड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन तो मृतदेह बीडच्या जिल्हा रुग्णालयांमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून हा अपघात नसून हा घातपात असल्याचे त्यांना वाटले. त्यानुसारच नेकनूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून हा खरोखरच अपघात नाही. तर,हा घातपातच असल्याचे निष्पन्न केले व एका आरोपीला नेकनूर पोलिसांनी बेड्या ठोकून पोलीस स्टेशनला आणले व त्या व्यक्तीनेही गुन्ह्याची कबुली दिली. परंतू इतर आरोपींना बेड्या ठोकेपर्यंत त्या पकडलेल्या आरोपीचे नाव समजू शकले नाही. व तो आरोपीही बाहेरचा कोणी नसून खून झालेल्या व्यक्तीचा अगदी जवळचा नातेवाईक असल्याने त्याने हा खून का केला ? याची चौकशी सुरू असून, खून झालेल्या तरुणाचे वडिल शहादेव ढास यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये कलम 302,201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेकनूरमध्ये स्वत: पीआय भारत राऊत
साडे तीन तास होते तळ ठोकून
या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, या प्रकरणातील गुढ बाहेर काढण्यासाठीच राऊत स्वत: नेकनूरमध्ये जवळपास साडे तीन तास तळ ठोकून होते. त्यांनीही या प्रकरणाच्या तपासाला गती दिल्यामुळे नेकनूर पोलिस आरोपीपर्यंत पोहचले आहेत.
नेकनूर पोलिसांचे कौतुकास्पद कार्य
ही घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये नेकनूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या गुन्ह्याची उकल करून एका आरोपीला बेड्या ठोकण्यात यश मिळवून राहिलेल्या आरोपींनाही लवकरात लवकर अटक करण्याचे ठरवले आहे. यामुळे सर्व स्तरांमधून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.