बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : सायबर भामट्यांनी नवी शक्कल आजमावत बीडच्या एसबीआय बँकेच्या एटीएम मशिनच्या हार्डवेअरमध्ये छेडछाड केली आणि संगणकाच्या सहाय्याने 4 लाख 40 हजार 500 रुपये काढून घेतले. याप्रकरणी अज्ञात भामट्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बीड एसबीआय बँकेचे मुख्याधिकारी आनंदकुमार महेंद्रकुमार महातो यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांच्या जालना रोडवरील शाखेच्या खालीच बँकेचे एटीएम मशीन आहे. 14 जून रोजी नेहमीप्रमाणे बँकेच्या अधिकार्यांनी एटीएम मधील रोख रक्कम तपासली असता मशीनच्या डमिन बॅलन्स आणि रोख रकमेत 4 लाख 40 हजार 500 रुपयांची तफावत आढळून आली. याबाबत त्यांनी तपास केला असता अज्ञात इसमाने संगणक आणि इतर साधनांचा वापर करून सदरील एटीएम मशिनच्या हार्डवेअरमध्ये एरर निर्माण केला आणि पासवर्डचा गैरवापर करून त्याच्या आयडीएफसी बँकेच्या खात्यावर साडेचार लाखांची रक्कम ट्रान्सफर करून घेतली. सदर फिर्यादीवरून त्या अज्ञात इसमावर बीड शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.