बीड,दि.16 (जि.मा.का.):- खरीप हंगाम 2021-22 करिता बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खाजगी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका मार्फत पीक कर्ज वाटप सुरू आहे. बीड जिल्ह्यात खरीप हंगाम 2021-22 करिता 1 हजार 600 कोटी रुपयांच्या पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत बीड जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, खाजगी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका मार्फत 25 हजार 386 शेतकरी सभासदांना रुपये 167.75 कोटी एवढी पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. पीक कर्ज वाटपाचा लक्षांक कोणत्याही परिस्थितीत दिनांक 30 जून 2021 अखेर पूर्ण करण्याच्या सक्त सुचना जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सर्व बँकांना दिलेल्या आहेत.
राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खासगी बँकांचे पिक कर्ज वाटपाचे लक्षांक विहित मुदतीत साध्य होणेसाठी गावपातळीवर पात्र शेतकरी सभासदांच्या पीक कर्ज मागणी अर्जांचे संकलन करण्यासाठी तलाठयांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्व नियुक्त तलाठ्यांना संबंधित तहसीलदार कार्यालयाकडून आवश्यक त्या सुचना देण्यात आलेल्या आहे. शेतकऱ्यांनी त्यांचे पीक कर्ज मागणी अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित तलाठी यांचेकडे दिल्यानंतर संबंधित तलाठी यांच्याकडून सदरची कागदपत्रे संबंधित राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, खाजगी बँकेच्या शाखेत दाखल करण्यात येतील. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पिक कर्ज वाटपाचे लक्षांक मुदतीत पूर्ण होण्यासाठी सहकार विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. अंतिम पीक कर्ज मंजुरी किंवा नामंजुरी बँकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येई. सर्व बँकांनी साध्य केलेल्या पिक कर्ज वाटपाचे लक्षांक पुर्ती बाबतचा आढावा जिल्हास्तरीय बँकर्स समितीमार्फत दर मंगळवारी जिल्हाधिकारी, बीड यांच्या कक्षात घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँका संदर्भात खरीप पीक कर्ज मिळविण्या करता कोणत्याही अडचणी असल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, बीड यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संदर्भात त्या-त्या तालुका उपसहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयाचे संपर्क साधावा.
शासन निर्णय दिनांक 11 जुन 2021 अन्वये डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सुधारणा करण्यात आलेली असून सदर योजनेचा फायदा अधिकाधिक शेतकऱ्यांना होण्याचे दृष्टीने सन 2021-22 या वर्षापासून अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्याची परतफेड विहित मुदतीत करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 3 लाख पर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के (0%) व्याज दराने कर्ज उपलब्ध होईल.
यापुर्वी या योजने अंतर्गत अल्पमुदत पीक कर्ज मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत 3 टक्के व्याज सवलत व रुपये 1 लाख ते 3 लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत 1 टक्के व्याजदराने सवलत देण्यात येत होती. या सुधारित शासन निर्णयामुळे चालू खरीप हंगामापासून रुपये 3 लाख पर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासन देत असलेली व्याजदर सवलत 3 टक्के व केंद्र शासनाकडून मिळणारी 3 टक्के व्याज सवलत या दोन्हींचा एकत्रित फायदा मिळाल्याने शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज उपलब्ध होईल.
सबब सर्व पात्र शेतकऱ्यांनी सन 2020-21 मध्ये घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड दिनांक 30 जून 2021 पर्यंत करून नवीन पीक कर्जासाठी संबंधित बँक शाखेत प्रस्ताव दाखल करावेत व डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे