महाराष्ट्र

राज्यात १८ जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे ‘अनलॉक’, सर्व निर्बंध मागे; जिल्ह्यांची एकूण ५ स्तरांमध्ये विभागणी

राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षेबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात इयत्ता १२ वीची परीक्षा रद्द करण्यासोबतच राज्यात आता एकूण पाच स्तरांवर अनलॉक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील अनलॉकची विभागणी पाच स्तरांवर करण्यात आली आहे. यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि एकूण ऑक्सिजन बेड्स २५ टक्के व्यापलेले असतील अशा ठिकाणी पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे. यात सर्व दुकानं, गार्डन, सलून, थिएटर्स, मनोरंजनाची ठिकाणं सुरू ठेवता येणार आहेत. या पहिल्या स्तरामध्ये एकूण १८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. धुळे, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ याठिकाणी आता पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी उद्यापासूनच केली जाणार आहे.

अनलॉकचे एकूण पाच स्तर नेमके कोणते?
पहिला स्तर- पूर्णपणे अनलॉक
दुसरा स्तर- मर्यादित स्वरुपात अनलॉक
तिसरा स्तर- निर्बंधासह अनलॉक
चौथा स्तर- निर्बंध कायम
पाचव्या स्तर- रेड झोन, पूर्णपणे लॉकडाऊन

मुंबई लोकलचं काय?
मुंबईचा दुसऱ्या स्तरामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत सध्यातरी लोकल सेवा सुरू होणार नाही, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. पण येत्या आठवड्यात रुग्णांची संख्या कमी झाली तर लोकल संदर्भातही निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसऱ्या स्तरामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्याचा समावेश आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!