महाराष्ट्र

6 जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करा अन्यथा रायगडावरून आंदोलनाला सुरूवात, मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी सरकारपुढे ठेवले तिन पर्याय


बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खा. शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून शुक्रवारी छत्रपती संभाजी महाराजांनी अभ्यासू भूमिका घेत चांगलाच दम भरला. समाजाच्या मागण्या घेऊन आम्ही येणार्‍या काळात रस्त्यावर उतरू असा सज्जड दम देत लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. या निमित्ताने दिल्ली व रायगडाचा झगडा पुन्हा एकदा समोर येणार आहे. 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंत आपण राज्य सरकार मराठा आरक्षण बाबत काय निर्णय घेते त्याची वाट पाहणार आहोत, अन्यथा 7 जून ला रायगडावर येऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येईल, असा इशारा छत्रपती संभाजी महाराज यांनी दिला आहे.
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर संभाजी महाराज यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांची भेट घेत आपली भूमिका मांडली. त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका विशद केली. ते म्हणाले की, राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला समावेश करता येईल का हे सांगावे, काही मराठा नेते याबाबत बोलत आहेत, मात्र आपल्याला हे शक्य वाटत नाही, तरी महाविकास आघाडी मधील नेत्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे संभाजी महाराजांनी म्हटले आहे. दरम्यान महाराजांनी 7 जून रोजी आंदोलनाची भूमिका घेतल्याने आता सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संभाजीराजे छत्रपती यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मनोगत सुरू करण्यापूर्वी मी स्पष्ट करतो की, सकल मराठा समाजाच्या वतीनं मी बोलतोय. कुठल्याही राजकीय पक्षाचा अजेंडा घेऊन आलेलो नाही. सकल मराठा समाजाला न्याय मिळायला हवा. छत्रपतींचा वंशज म्हणून सांगू इच्छितो की, जो महाराष्ट्र मी 2007 पासून पिंजून काढतोय, मराठा समाजावर जो अन्याय आज होतोय, त्याविरोधात हा लढा आहे, असंही त्यांनी सांगितलंय.1917 ला शाहू महाराज खामगावला गेले होते. तिथे ते म्हणाले होते की, मी मराठ्यांचं नेतृत्व करण्यासाठी नाही तर शेतकरी, शिपाई गडी म्हणून आलोय. त्याप्रमाणे मीही आज शिपाई गडी म्हणून आलोय. जस्टिस गायकवाड यांचा अहवाल अवैध ठरलाय. कायदा रद्द झालाय. आपण सामाजिक मागास राहिलो नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला फॉरवर्ड क्लास असं संबोधलं आहे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणालेत. 9 ऑगस्ट 2017 ला जेव्हा मी मराठा समाजाच्या स्टेजवर गेलो. तेव्हा मला सांगण्यात आलं तिथे जातीजातीमध्ये वाद होण्याची शक्यता होती. आज मी त्या सर्व शिवभक्तांचे आभार व्यक्त करतो, असं ते म्हणालेत.तीच परिस्थिती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आली. तेव्हाही मी समंजसपणाची भूमिका घेतली. उद्रेक होता कामा नये, असं मी सांगितलं. तेव्हा अनेकांना वाटलं की, संभाजीराजेंची मवाळ भूमिका का? पण त्या भूमिकेनंतर माझ्यावर आरोप केले गेले. सत्ताधारी आणि विरोधकांच्या भांडणात समाजाचं काही घेणं देणं नाही. आमचं मागणं एकच की, आम्हाला न्याय मिळवून द्या. तुम्ही समाजाला वेठीस धरू नका. त्यांनी त्यांची ताकद 58 मोर्चातून दाखवून दिली आहे, असंही संभाजीराजे छत्रपतींनी अधोरेखित केलंय.

मार्ग निघेल – धाकल्या पवारांचा विश्वास
आम्ही सांगितलेल्या पाच गोष्टींवर निर्णय घेतला नाही तर 7 जून रोजी मी स्वत: आंदोलन करेल, असा इशारा भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी दिला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनाला अजून 9 दिवस बाकी आहेत. तोपर्यंत मार्ग निघेल, असे सूचक संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.

महाराजांनी सरकार पुढे ठेवले तीन पर्याय

मराठा आरक्षणासाठी संभाजी महाराजांनी सरकार पुढे तीन पर्याय ठेवले आहेत. राज्य सरकारने तात्काळ रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी. हा राज्य सरकारचाच विषय आहे, तसेच रिव्ह्यू पिटीशन टिकलं नाही तर क्युरिटिव्ह पिटीशन दाखल करावी. हा शेवटचा पर्याय आहे. पण हा पर्याय अपवादात्मक आहे. त्यासाठी भक्कम पुरावे घेऊनच कोर्टात जावं लागणार आहे. त्याचप्रमाणे 342 ‘अ’ च्या माध्यमातून आपण प्रपोजल केंद्राकडे देऊ शकतो. राज्यपालांच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देतील. त्यांना योग्य वाटलं तर ते संसदेकडे पाठवतील, असे तीन पर्याय त्यांनी सरकारपुढे ठेवले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!