महाराष्ट्र

अकरावी प्रवेशासाठी द्यावी लागणार सीईटी परीक्षा !

मुंबई:- कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट आणि तिसऱ्या लाटेची शक्‍यता, या पार्श्‍वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने (State Cabinet) दहावीची परीक्षा (Tenth Exam) रद्दचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल आता दहावीतील अंतर्गत लेखी मूल्यमापनावरून 30 गुण, दहावीचे गृहपाठ अथवा तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेतून 20 गुण आणि नववीच्या विषयनिहाय निकालावरून 50 गुण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. जूनअखेर निकाल जाहीर करण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) केली आहे.
राज्यातील कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाधित व मृत्यूचे प्रमाण खूप मोठे असल्याने शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थी, पालक, परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक, शिक्षणतज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्यांशी वारंवार चर्चा करून 24 वेळा बैठक घेतल्या. त्यानंतर परीक्षा रद्द करून दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुणदान धोरण निश्‍चित करण्यात आले. मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यात दहावीचे शिक्षण सुरू असताना शाळांनी केलेले अंतर्गत मूल्यमापन, गृहपाठ अथवा शाळांनी आतापर्यंत विद्यार्थ्यांची घेतलेली तोंडी, लेखी परीक्षा आणि त्या विद्यार्थ्यांचे नववीतील विषयनिहाय गुण, याचा विचार करून निकाल जाहीर केला जाणार आहे. मूल्यमापन धोरण करताना विद्यार्थ्यांची कोव्हिड-19 पूर्व काळातील संपादणूक पातळीही विचारात घेतली जाणार आहे. सध्या तो विद्यार्थी दहावीत असल्याने त्याचा मागील वर्षीचा नववीचा निकाल वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित असणार आहे. त्यामुळे त्या वर्गातील गुणांचा आधार दहावीच्या निकालासाठी घेतला जाणार आहे.

निकालासाठी शाळास्तरावर सात सदस्यीय समिती
दहावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर ठरलेल्या कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांचा पारदर्शक निकाल तयार करावा लागणार आहे. निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची निकाल समिती स्थापन केली जाणार आहे. या निकालाची विभागीय स्तरावर पडताळणी केली जाणार आहे. शाळा स्तरावर निकाल तयार करताना काही विद्यार्थ्यांच्या निकालात गैरप्रकार अथवा कागदपत्रांत फेरफार केल्याचे आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंग व दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पुणे बोर्डाकडून जूनअखेर निकाल जाहीर होईल, अशी तयारी करण्यात आल्याचेही शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी, पुनर्परीक्षार्थी, खासगी, तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणाऱ्यांचाही स्वतंत्र निकाल जाहीर होईल. श्रेणीसुधार योजनेअंतर्गत त्यांना परीक्षेच्या एक किंवा दोन संधी दिल्या जाणार आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!