मुंबई : राज्यात १५ ते २० मे या कालावधीत तौत्के चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात घरे व अन्य बांधकामांची पडझड झाली. तसेच पावसाळाही तोंडावर आला आहे. ही बाब लक्षात घेत बांधकांमांची दुरुस्ती व मजबुतीकरण ही कामे प्रभावित होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बांधकाम व्यवसाय आणि बांधकाम साहित्याशी संबंधित दुकाने यांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार निर्बंधांमध्ये सूट देत ही दुकाने खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
राज्य सरकारने करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १३ एप्रिल रोजी ब्रेक द चेन अंतर्गत आदेश जारी करून कठोर निर्बंध लादले आहेत. त्यात अत्यावश्यक बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आता बांधकाम साहित्याशी संबंधित दुकाने आणि व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात नेमकी कोणत्या दुकांनाना सूट असणार हे सुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे.
आगामी पावसाळी मोसमाच्या अनुषंगाने त्याच्याशी संबंधित दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात छत्र्या, प्लास्टिकच्या शिट्स, ताडपत्र्या, पावसाळी पोशाख इत्यादी बाबींची विक्री व दुरुस्ती करणारी दुकाने व व्यवसाय सुरू ठेवता येतील.
- 1) कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील अशा साहित्यांची दुकाने व व्यवसाय सुरू राहतील.
- 2) अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी ज्या वेळा देण्यात आल्या आहेत त्याच वेळा हे व्यवसाय व दुकानांसाठी लागू असतील.
- 3) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आवश्यक वाटल्यास सदर दुकाने व व्यवसाय यांच्या वेळा या अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी लागू वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ वाढवून देता येतील.
- 4) संबंधित सर्व व्यक्तींनी कोविड यथायोग्य वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक आहे.
- 5) नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व संस्थेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून रु. १० हजार इतका दंड ठोठावण्यात येईल व कोविड १९ महामारीची आपत्तीची अधिसूचना अस्तित्वात असेपर्यंत संबंधित व्यवसाय व दुकाने बंद ठेवण्यात येतील.