हैदराबाद : डोळ्यात औषध टाकल्यानंतर ऑक्सिजन पातळी वाढवणारे औषध नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपट्टणम (Nellore district) येथील एका वैद्याने तयार केले असून ते घेण्यासाठी हजारो लोक रांगा लावत आहेत. त्यांचे नाव आनंदय्या असे आहे. विशेष म्हणजे ते औषध मोफत देत आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या औषधाचा गुण येत असल्यामुळे अनेक नेते, अधिकारी त्याचा लाभ घेत असून आनंदय्या यांच्याविषयी कृतज्ञता प्रकट करीत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडलेल्या रुग्णांची आर्थिक आणि शारीरिक परवड होत असताना ही घटना आंध्र प्रदेशच नव्हे तर देशात चर्चेचा विषय ठरली आहे. हे औषध घेण्यासाठी शेजारील राज्यांतील हजारो लोकही येऊ लागले आहेत.
आमदार काकाणी गोवर्धन आणि माजी मंत्री चंद्रमोहन रेड्डी यांनी सांगितले की, रुग्णाची स्थिती कितीही गंभीर असली तरी दोन दिवसांत तो पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होत आहे. छातीतील संसर्गाची तीव्रता २४.२५ च्या घरातून शून्य होत आहे. गेल्या काही दिवसांत लोकांची झुंबड उडाल्यानंतर पोलिसांनी औषधाचे वितरण रोखण्याचा प्रयत्न केला आणि सरकारने औषधाचे परिक्षण करावे आणि तोपर्यंत वितरण थांबवावे असे सांगण्यात आले, तसेच लोकायुक्तांकडे तक्रारही करण्यात आली.
औषधाचे परिक्षण
यानंतर नेल्लोरचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व प्रमुख आयुर्वेदिक डॉक्टरांनी औषधाचे परिक्षण केले. त्यानंतर त्यांनी शिक्कामोर्तब केले. यासाठी नेमण्यात आलेल्या समितीमधील एका तज्ज्ञाने सांगितले की, आमच्यासमोर एका रुग्णाची ऑक्सिजन पातळी ८३ होती. डोळ्यांत दोन थेंब टाकण्यात आल्यानंतर ती ९५ पर्यंत वाढली. औषध घेतलेल्या एकाही रुग्णाने याबाबत तक्रार केलेली नाही. उलट आनंदय्या यांच्यामुळे जीव वाचल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझे औषध रुग्णांचा जीव वाचविते. मी तीन प्रकारचे औषध देतो. कोरोना संसर्गच होऊ नये, झाल्यास तो बरा करणारे आणि ऑक्सिजन पातळी वाढविणारे असे प्रकार आहेत. मी औषधासाठी एक नवा पैसाही घेणार नाही, असं वैद्य आनंदय्या यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री वापरास प्रोत्साहन देणार
आंध्रचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या औषधाच्या वापरास सरकार प्रोत्साहन देण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले. त्यासाठी अधिकाऱ्यांनी औषधाचे वितरण आणि इतर पूरक बाबींचा अभ्यास करून योग्य पावले टाकावीत असा तोंडी आदेश देण्यात आला.
उपराष्ट्रपतींकडून दखल
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही याची दखल घेतली आहे. आयुष मंत्रालयाचे हंगामी मंत्री किरण रिजीजू आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या औषधाचा अभ्यास करून वितरणाबाबत पावले टाकावीत अशी सूचना त्यांनी केली.